July 28, 2026
IMG-20260706-WA0078

उद्या पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे बैठक

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील उजनी धरण पट्ट्यातील गावांमध्ये शेतीपंपांसाठी केवळ दोन तास वीजपुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. ऊस, डाळिंब, केळी, चारा तसेच इतर नगदी पिके पाण्याअभावी करपण्याच्या मार्गावर असून हजारो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन भाजपचे जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य गणेश चिवटे यांनी सोमवारी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन उजनी धरण पट्ट्यातील गावांना किमान आठ तास नियमित व अखंडित वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी केली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात महावितरणकडून होत असलेल्या अपुऱ्या व अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पिकांना वेळेवर पाणी देता येत नसल्याने उत्पादन धोक्यात आले असून जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आठ तास वीजपुरवठा सुरू करावा अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक नवनाथ झोळ, वाशिंबे गावचे उपसरपंच अमोल पवार, अमोल भोईटे आणि अजित झोळ उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!