करमाळा, प्रतिनिधी – उजनी जलाशय परिसरातील शेतीपंपांच्या वीज कपातीविरोधात आंदोलन छेडलेल्या उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या आक्रमक भूमिकेनंतर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुचित्रा डुंबरे यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी आवश्यक कायदेशीर व प्रशासकीय कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर समितीने नियोजित आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले.

धरणात सध्या समाधानकारक पाणीसाठा उपलब्ध असून बिगर सिंचन व पिण्याच्या पाण्याचे आरक्षण सुरक्षित ठेवून शेतीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याबाबत वरिष्ठ स्तरावर तातडीने आदेश काढण्यात येतील, असे आश्वासन पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानुसार सध्या दोन तासांपुरता मर्यादित असलेला वीजपुरवठा पूर्वीप्रमाणे आठ ते दहा तास करण्यासाठी पाठपुरावा सुरू करण्यात आला आहे.

संघर्ष समितीचे अध्यक्ष शिवाजीराव बंडगर यांनी हा धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असल्याचे सांगितले. त्यांनी प्रशासनाच्या लेखी शब्दाचा मान राखून उपोषण स्थगित केल्याचे स्पष्ट केले; मात्र आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

निर्णयानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी समितीचे उपाध्यक्ष भारत साळुंखे, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, नवनाथ शिंदे, विजय नवले, अखलाक जहागीरदार, संपत सरडे, दिलदार मुलानी यांच्यासह अनेक पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

.

.

.

.

