शहराच्या मध्यवर्ती चौकात चौफेर झडल्या जेवणाच्या पंगती
करमाळा, प्रतिनिधी – श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून निघालेल्या संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे करमाळा शहरात रविवारी सकाळी सव्वा दहा वाजता उत्साहात आगमन झाले. शहरातील राशिन पेठ तरुण सेवा मंडळाच्या अवघ्या अर्ध्या तासाच्या पाहूणचारा नंतर रविवारच्या जेऊर येथे असलेल्या मुक्कामासाठी पालखी मार्गस्थ झाली.

शहरातील कर्जत रस्त्यावरील श्री नागनाथ मंदिरासमोर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवक मुख्याधिकारी व सर्व कर्मचारी यांच्या स्वागतानंतर पालखीचा शहरात प्रवेश झाला. यानंतर दरवेळी प्रमाणे राशीन पेठ तरुण सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालखी खांद्यावर घेत शहरातून वाजत गाजत सुभाष चौक येथे आणली. दरम्यान शहरातील डॉ. गायकवाड चौकात पालखीवर जेसीबी तून पुष्पवृष्टी तसेच फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली.

पालखी सुभाष चौकात विसावल्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्यासह शहरातील भाविकांनी पालखीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. यासोबतच पालखीच्या चहुबाजूंनी म्हणजेच दत्तपेठ व्यापारी पेठ गजराज तरुण मंडळ आणि राशीन पेठेच्या रस्त्यांवर लांबच्या लांब वारकऱ्यांच्या पंगती बसल्या. यावेळी या रस्त्यांवर ठिकठिकाणी नेमून दिलेल्या जागांवरून त्या त्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांना भोजन वाढण्यास सुरुवात केली. अवघ्या दहा मिनिटात संपूर्ण पालखीतील हजारो वारकऱ्यांना एकाच वेळी जेवण वाढण्यात आले. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल चा गजर झाला आणि वारकऱ्यांनी भोजनास सुरुवात केली.

विठ्ठल भेटीची आस लागलेल्या वारकऱ्यांनी केवळ 20 मिनिटांत जेवण आटोपून पंढरीचा मार्ग धरला. याच वेळी नगरपालिकेने शहराचा पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे वारकऱ्यांना जागेवरच मुबलक पिण्याचे पाणी उपलब्ध झाले. याशिवाय मंडई येथील मारुती मंदिरा जवळ नगरसेविका अश्विनी अब्दुले यांनीही वारकऱ्यांना हजारो पाण्याच्या बाटल्यांचे वाटप केले. पंगती उठल्यानंतर आणि शहरातील भाविकांचे दर्शन आटोपल्यानंतर पुन्हा राशिन पेठ तरुण सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पालखी खांद्यावर घेत विकास नगर येथील दत्त मंदिर येथे आणून पालखीला जड अंतकरणाने निरोप दिला. यावेळी सोहम महिला मंडळाच्या सदस्यांनी अभंग म्हणत पालखीची दत्त मंदिरापर्यंत साथ केली.

पालखी आगमनाच्या निमित्त नगरपालिकेकडुन शहराच्या चारही बाजूंना आकर्षक कमानी उभारून वारकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. कर्जत रस्त्यावर कै. सखाराम ढाणे व विठ्ठल ढाणे यांच्या स्मरणार्थ चहा नाश्त्याचे तर अजिंक्य इलेक्ट्रॉनिक्स यांच्याकडून वारकऱ्यांना चहा पुरवण्यात आला. करमाळा शिवसेनेकडून श्री देवीचा माळ रस्त्यावर तर राष्ट्रवादी पक्षातर्फे शहरातील बायपास येथे वारकऱ्यांना पाणी, चहा, नाश्त्यासह औषधांचे वाटप करण्यात आले. कै. बाबुराव (तात्या) गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने वारकऱ्यांना तीन दिवस सकाळ संध्याकाळ चहा, बिस्कीट व शुद्ध पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले. वारकरी पंढरीच्या वाटेवर असताना शहरातील पोस्ट ऑफिस समोर फिनोलेक्स पाईप्सच्या वतीने त्यांना आधाराच्या काठ्या, टोप्या, रेनकोट आणि पिशव्यांचे वाटप करण्यात आले. तसेच विकास नगर येथील दत्त मंदिरासमोर रोटरी क्लब ऑफ अहिल्यानगर आणि करमाळा शहरातील वरद हॉस्पिटल यांच्या वतीने वारकऱ्यांची मोफत तपासणी करून अंगदुखीसह दातदुखीवरीलही औषधे मोफत देण्यात आली.

दिंड्यापालख्यांच्या मांदीयाळीने करमाळा शहर व परिसर भक्तीमय
आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर अवघ्या काही टप्प्यांवर उरले असताना ज्येष्ठ अमावस्येनंतर करमाळा शहरात मराठवाडा, विदर्भ, खानदेश भागातून विविध दिंड्या पालख्यांच्या आगमनाला सुरुवात होते. शहरभरातील ठरलेल्या यजमानांकडे या दिंड्या-पालख्याचे मनोभावे आदरातिथ्य केले गेले. यासोबतच शिवसेना वैद्यकीय कक्ष व शिवसेना करमाळा यांच्यावतीने दि.१८ ते २१ असे चार दिवस वारकऱ्यांना चहा, नाष्टा, उपवासाचे पदार्थ यांच्यासह वैद्यकीय शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे. तसेच स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील बायपास रस्त्यावर वारकऱ्यांना नाश्ता पाकीटे, चहा आणि पाण्याचे वाटप सुरू आहे.

.

.

.

.

