July 27, 2026
IMG-20260723-WA0026

करमाळा, प्रतिनिधी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त “सेवा संकल्प” उपक्रमांतर्गत भारतीय जनता पार्टी करमाळा शहर मंडळाच्या वतीने गायकवाड चौक येथील भाजपा संपर्क कार्यालयात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. करमाळा शहर व तालुक्यातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत ५५६ रक्तपिशव्यांच्या संकल्पालाही मागे टाकत विक्रमी रक्तसंकलन केले.

शिबिराचे उद्घाटन भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सहसंयोजक विक्रम देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून राष्ट्रसेवा व समाजसेवेचा संकल्प करण्यात आला. तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना विक्रम देशमुख यांनी भाजप नेते गणेश चिवटे यांच्या कार्याचे कौतुक केले. पक्ष संघटनाबरोबरच समाजकारणातही त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगत, रक्तदान शिबिराला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद हा त्यांच्या जनसंपर्काचा व समाजसेवेचा सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.

गणेश चिवटे यांनी सांगितले की, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन केले जाते. यंदा ५५६ रक्तपिशव्या संकलित करण्याचा संकल्प करण्यात आला होता. पावसाचे वातावरण असूनही नागरिक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवल्यामुळे हा संकल्प पूर्ण होण्याबरोबरच अपेक्षेपेक्षाही अधिक रक्तसंकलन झाले. या यशाचे श्रेय सर्व रक्तदाते, कार्यकर्ते आणि समाजहिताची जाणीव ठेवून सहभागी झालेल्या नागरिकांना असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, नगरसेवक रामभाऊ ढाणे, ज्येष्ठ नेते भगवानगिरी गोसावी, संजय घोरपडे, तालुका सरचिटणीस नितीन झिंजाडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि करमाळा शहर व तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!