अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
करमाळा, प्रतिनिधी – दिल्लीतील जंतर मंतर येथे विद्यार्थी व विद्यार्थिनींवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत करमाळा तालुका काँग्रेस (आय)चे तालुकाध्यक्ष प्रतापराव नामदेवरावजी जगताप यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करमाळा तहसीलदार व पोलीस निरीक्षक करमाळा यांना गुरुवारी निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली.

याबाबत अधिक माहिती देताना तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप म्हणाले की, नीट परीक्षेचा पेपर लीक झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य हे अंधारामय झाले आहे. यामुळे दिल्लीतील जंतर-मंतरवर विद्यार्थी व विद्यार्थिनी कायदेशीर मार्गाने आंदोलन करीत असताना पोलिसांकडून विद्यार्थी व विद्यार्थिनी वर अमानुष लाठी चार्ज करण्यात आला, हे अतिशय निंदनीय आहे. या विद्यार्थी-विद्यार्थिनींना समर्थन देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित असलेले खासदार राहुल गांधी, खा. प्रियंका गांधी तसेच सोलापूर लोकसभेच्या खासदार प्रणिताताई शिंदे यांना अमानुषपणे धक्काबुक्की करत अटक करण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची मोदी सरकारकडून करण्यात आलेली चुकीची हाताळणी तसेच विद्यार्थ्यांवरील दडपशाही आणि आंदोलनाचा आवाज बळाचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप यावेळी जगताप यांनी केला. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना या पदावर राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. सरकार अहंकारी झाले असून कोणाचेही ऐकून घेण्यास तयार नाही. देशामध्ये सरकारकडून संविधान आणि लोकशाहीच्या मूल्यांचा आदर केला जात नाही. विद्यार्थ्यांवर आणि विरोधी पक्षाच्या नेत्यावर ज्या प्रकारे अत्याचार करीत आहेत हे अत्यंत निषेधार्य आहे.

या घटनेमुळे देशातील जनतेमध्ये निर्माण झालेला प्रचंड रोष आता जन आंदोलनाचे रूप घेत असून ही नव्या क्रांतीची सुरुवात आहे. येत्या दोन दिवसांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला गेला नाही तर करमाळा तालुका काँग्रेस (आय) पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही शेवटी करमाळा तालुका काँग्रेसचे (आय ) अध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी दिला आहे.

यावेळी करमाळा तालुका युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव वाघमारे, अण्णा साळवे, अभिमान लष्कर, प्रतीक जगताप, किरण साळुंखे, बबलू चिंचकर, अशोक घरबुडे, नितीन चोपडे, गफूर शेख, सोमनाथ राखुंडे, योगेश राखुंडे, परवेज भाई पठाण, देवराव सुकळे, गणेश फलफले, सचिन कटारिया, मंगेश चिंचकर, अन्वर शेख, मुनीर शेख, असिफ बागवान, शिवाजी आवटे आदीजण उपस्थित होते.

.

.

.

.

.

