करमाळा, प्रतिनिधी – श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठान संचलित नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल व ट्विंकलिंग स्टार्स येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. महर्षी वेदव्यास जयंतीचे औचित्य साधत आयोजित कार्यक्रमात गुरु-शिष्य परंपरेचा जागर करण्यात आला. तसेच ट्विंकलिंग स्टार्सच्या नव्या वर्गखोलीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यश कल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कविता कांबळे, संस्थेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, शाळेच्या सर्वेसर्वा सुनीता देवी उपस्थित होत्या. यावेळी शशांक कांबळे, प्रवीण प्रजापती, सिकंदर बागवान, मुक्कीम सिद्दिकी तसेच मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मुख्याध्यापिका अश्विनी क्षीरसागर यांनी प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व विशद केले. यानंतर इयत्ता नववीतील विज्ञान, गणित व इंग्रजी विषयांतील प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला.
डॉ. कविता कांबळे यांनी माजी मुख्याध्यापिका स्व. सुनीता मोहिते यांच्या स्मरणार्थ विज्ञान व गणित विषयात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास ₹३,००० व द्वितीय येणाऱ्यास ₹२,००० चे पारितोषिक जाहीर केले. तर सुनीता देवी यांनी स्व. प्रमिलाबेन गोपालदास शहा यांच्या स्मरणार्थ इंग्रजी विषयात प्रथम येणाऱ्यास ₹३,००० व द्वितीय येणाऱ्यास ₹२,००० चे पारितोषिक प्रदान केले. कु. भक्ती वायकर हिने विज्ञान व गणित विषयात प्रथम, तर इंग्रजी विषयात द्वितीय क्रमांक मिळविला. कु. तनिष्का बेद्रे हिने इंग्रजी विषयात प्रथम, तर विज्ञान व गणित विषयात द्वितीय क्रमांक पटकावला.
यावेळी ‘डिप्लोमा इन अर्ली चाइल्डहुड केअर एज्युकेशन’ अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या अक्षता बुद्रुक, गायत्री परदेशी, राणी ढेरे, झीनत शेख आणि अनिता मुरूमकर या शिक्षिकांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी शशांक प्रमोद कांबळे याचा नीट परीक्षेत ५८४ गुण मिळविल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमात इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी आई-वडील आणि गुरु यांच्या महत्त्वावर आधारित नृत्य सादर केले. इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी नाटिका व समूहगीत सादर करून गुरूंना अभिवादन केले. ट्विंकलिंग स्टार्समधील विद्यार्थ्यांनी गुलाबपुष्प अर्पण करून आपल्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सुनीता देवी यांनी विद्यार्थ्यांना यशस्वी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले, तर डॉ. कविता कांबळे यांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचे कौतुक केले. अध्यक्षीय समारोपात गणेश करे पाटील यांनी नर्सरी ते चौथी आणि पाचवी ते दहावी या गटांतील प्रत्येकी एका आदर्श शिक्षिकेला ₹५,००० चे पारितोषिक देण्याची घोषणा केली. तसेच दरवर्षीप्रमाणे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन नयना देशमुख यांनी केले.

.

.

.

.

