August 5, 2026
IMG-20260730-WA0064

जेऊर येथे गरजू महिलांना ५० टक्के अनुदानात शिलाई मशीन वाटप

करमाळा, प्रतिनिधी – महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी पद्मजा इंगवले यांचे कार्य कौतुकास्पद असल्याचे तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी म्हटले आहे. सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा पद्मजा इंगवले-जगताप यांच्या पुढाकारातून गरजू महिलांसाठी ५० टक्के अनुदानात शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तालुक्यातील जेऊर येथे रविवार दि.२७ रोजी एकल, विधवा तसेच समाजातील दुर्बल घटकांतील महिलांना तहसीलदार शिल्पा ठोकडे, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, शिवसेना नेते राजकुमार हिवरकर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या या उपक्रमाला महिलांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद दिला.

यावेळी पुढे बोलताना तहसीलदार ठोकडे यांनी सांगितले की, पद्मजाताई इंगवले या गेल्या अनेक महिन्यांपासून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. त्यांच्या माध्यमातून अनेक महिलांना रोजगाराची संधी मिळाली असून, आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविण्यास मदत झाली आहे. विशेषतः विधवा महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

शिवसेनेचे राजकुमार हिवरकर पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, शिवसेना ही ८०% समाजकारण आणि २०% राजकारण या विचारावर कार्यरत आहे. कोणत्याही निवडणुका नसताना पद्मजा इंगवले या महिलांसाठी सातत्याने विविध उपक्रम राबवत असतात. त्यांचे कार्य प्रत्येक शिवसैनिकासाठी प्रेरणादायी आहे.

यावेळी पद्मजा इंगवले यांनी सांगितले की, महिलांना स्वावलंबी व सक्षम बनविणे हेच त्यांच्या कार्यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. आतापर्यंत करमाळा तालुक्यात हजारो महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले असून, त्यामागे महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. समाजाचे काहीतरी देणे लागते या भावनेतून भविष्यातही अशाच समाजोपयोगी उपक्रमांची अंमलबजावणी सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.

शिलाई मशिन वाटपासोबतच इंगवले यांच्याकडून शेतकरी महिला व पुरुषांसाठी शेळीपालन, कुक्कुटपालन आणि दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन या विषयांवरील दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना प्रशस्तीपत्रही देण्यात आले. तसेच कार्यक्रमातील उपस्थितांना केशर आंब्यांच्या रोपांचे वाटपही करण्यात आले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमातील लाभार्थी महिला तसेच प्रशिक्षण शिबिरातील सहभागी नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत आयोजकांचे कौतुक केले.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!