September 4, 2026
माढा न्यायालय

न्यायालयीन कोठडीत रवानगी

करमाळा, प्रतिनिधी – मनोहर भोसलेवर कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात एकूण २४ आरोपी निष्पन्न करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. रामदास झोळ यांच्यासह संस्थेच्या सचिवा माया झोळ आणि संस्थेच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी पोलीस कोठडीत असलेल्या माया झोळ आणि इतर दोन आरोपींना शुक्रवारी माढा न्यायालयासमोर उभे केले असता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या इतर साथीदारांवर कुर्डूवाडी आणि करमाळ्यात एकूण ६ गुन्हे दाखल आहेत. यांपैकी कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात वाढीव कलमान्वये मनोहर भोसलेच्या अवैध पैशाची विल्हेवाट लावण्यामध्ये प्रा. रामदास झोळ यांचा सहभाग असल्याचे समोर आल्यानंतर दत्तकला संस्थेमधील आरोपी राजेंद्र गोकुळ हुंबे यास दि. ११/०८/२६ रोजी तर लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यास दि.१३/०८/२६ रोजी पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता या दोघांना दि.१७/०८/२६ रोजी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

दरम्यान या गुन्हयाचा सविस्तर तपास करीत असताना रामदास झोळ यांच्या पत्नी माया झोळ यांचा देखील गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने पोलिसांनी त्यांना दि.१६/०८/२६ रोजी अटक करून दि.१७/०८/२६ रोजी या तिन्ही आरोपींना माढा न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्यांना दि.२१ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती.

आज दि.२१ रोजी या तिन्ही आरोपींना माढा न्यायालयासमोर उभे केले असता माढा न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री ए. डी.कुलकर्णी यांनी या तिन्ही आरोपींची १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. यावेळी आरोपींच्या वतीने करमाळा न्यायालयातील विधीज्ञ ॲड. प्रमोद बलभीम जाधव आणि बारामती येथील ॲड. वैभव भोसले यांनी काम पाहिले. यासोबतच प्रा. रामदास झोळ यांच्या अटकपूर्व जामीनाची ही सुनावणी आज होणार होती, याबाबतची ही माहिती लवकरच देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!