१४ वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा शहरालगतच्या पांडे रस्त्यावरील सरपंच ढाब्यासमोर पुढे चालत असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडकून पिक अप पलटी झाल्याने पिक अप मधील तिघे गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघाताबाबत सविस्तर माहिती अशी की, अहिल्यानगर जिल्ह्यातील खेड (राशीन) येथील जाधव कुटुंब माढा तालुक्यातील ढवळस येथील अंबाबाई यात्रेत स्टेशनरीचा स्टॉल लावण्यासाठी पिक अप क्र. एम एच ४२ ए क्यू ४९९६ या पिक अप मधून निघाले होते. या प्रवासादरम्यान करमाळा शहराच्या पूर्वेकडील पांडे रस्त्यावर असलेल्या सरपंच ढाब्यासमोरील गतिरोधकाजवळ पुढे चालत असलेल्या ऊसाने भरलेल्या ट्रॉलीला पाठीमागून ओव्हरटेक करताना ट्रॉलीच्या डांबाला धडकून हा पिक अप रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाला. या अपघातात पिक अप मध्ये बसलेले लक्ष्मी तात्या जाधव (वय- ४० वर्षे), कल्याणी मोतीराम जाधव (वय-१४ वर्षे), अक्षय तात्या जाधव (वय-८ वर्षे) हे तिघे गंभीर जखमी झाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या स्थानिकांनी तात्काळ रुग्णवाहिकेला पाचारण करून जखमींना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

या अपघातात कल्याणी ही गंभीर जखमी असून अक्षय या आठ वर्षीय मुलाच्या डोक्याला तर लक्ष्मी यांच्या हाताला झालेल्या जखमांवर डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू केले. या अपघाताची माहिती मिळताच करमाळा पोलिसातील पोलीस नाईक चंद्रकांत गोरे यांनी अपघात स्थळी तसेच उपजिल्हा रुग्णालयात येऊन पुढील पोलीस कार्यवाही सुरू केली आहे.

या अपघातातून पीक अप चालक रामा लक्ष्मण जाधव (वय-५२ वर्षे), त्यांची पत्नी बायजा रामा जाधव (वय-४० वर्षे) आणि ११ वर्षीय साक्षी तात्या जाधव हे बालंबाल बचावले असून त्यांना कोणतीही जखम झालेली नाही. मात्र ट्रॉलीला ओव्हरटेक करत असताना पलटी झालेला पिक अप समोरून येणाऱ्या कारला केवळ घासून गेल्याने या कार मधील प्रवासीही थोडक्यात बचावले आहेत.

.

.

