September 4, 2026
IMG-20260904-WA0041

जरांगे पाटील यांची खालावत चाललेली तब्येत लक्षात घेऊन सरकारने त्वरित दखल घेण्याची जोरदार मागणी

करमाळा, प्रतिनिधी – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे दि.२९ ऑगस्टपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. मात्र त्यांच्या उपोषणाच्या सातव्या दिवशी पर्यंत सरकारने त्यांच्या मागण्या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ आणि त्यांच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी करमाळा शहरातील बायपास चौकात शुक्रवारी रास्ता रोको करण्यात आला.

शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच बायपास चौक येथे आंदोलक जमा होण्यास सुरुवात झाली होती. मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्यानंतर अकरा वाजल्याच्या सुमारास या जमावाने अहिल्यानगर सोलापूर मार्ग अडवत रस्त्यावरच ठाण मांडले. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या संदर्भात देण्यात येणाऱ्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. यानंतर तहसील प्रशासनाच्या प्रतिनिधीकडे हे निवेदन देण्यात आले.

यावेळी शेकडोंच्या संख्येने जमा झालेल्या आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. सुमारे तासभर हे आंदोलन चालल्यानंतर तहसील प्रशासनासह पोलीस प्रशासनाने आंदोलकांच्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन देत आंदोलकांना कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने रास्ता रोको आंदोलन थांबविण्याची विनंती केली.

मराठा समाजाच्या आंदोलनांदरम्यान कोणताही गैरप्रकार न होऊ देण्याच्या जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार आंदोलकांनी आंदोलन स्थगित केले असले तरी स्थानिक महसूल प्रशासनाकडून कुणबी दाखले देण्यासंदर्भात होणाऱ्या अडवणुकी विरोधात वेगळी आंदोलन करण्यात येणार असल्याचे यावेळी संबंधितांकडून सांगण्यात आले.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!