October 28, 2026
IMG-20261002-WA0004

दोन आरोपींना अटक; गोपनीय माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्याची उकल

करमाळा, प्रतिनिधी : करमाळा तालुक्यातील वीट येथील शेतातून चोरीस गेलेला सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला पाळीचा मोगडा असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल करमाळा पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलिसांच्या या कामगिरीमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वीट येथील शेतकरी विजयकुमार महादेव गाडे (वय ६३) यांच्या मालकीचा सोनालिका कंपनीचा लाल रंगाचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेला पाळीचा मोगडा चोरीला गेला होता. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरण पथकाने गोपनीय बातमीदारांकडून मिळालेली माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयितांचा शोध घेतला. त्यानुसार दीपक रामदास बरडे (वय ३२, रा. चिखलठाण, ता. करमाळा, जि. सोलापूर; मूळ रा. अमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) आणि आकाश रामदास बरडे (वय २६, रा. अमळनेर, ता. पाटोदा, जि. बीड) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्यातील सहभागाची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी त्यांच्याकडून ३ लाख ५० हजार रुपये किमतीचा सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर आणि २५ हजार रुपये किमतीचा पाळीचा मोगडा असा एकूण ३ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सपोफौ हणुमंत जाधव करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. दिलीप ढेरे, स.पो.नि. हनुमंत जाधव, पो.ना. वैभव ठेंगल, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.कॉ.इसामिया बहीरे, पो.कॉ. रविराज गटकुळ, पो.कॉ. अमोल रंदिल, पो.कॉ. योगेश येवले, पो.कॉ. अर्जुन गोसावी, पो.कॉ. गणेश शिंदे, व सायबर पोलीस कॉन्स्टेबल जहिरान नाईकवाडी यांनी केली.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!