पाऊस नसल्याने पिकांचे मोठे नुकसान; उत्पादन खर्चही निघणे कठीण, दुष्काळी अनुदान व विमा भरपाई देण्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्याने आणि दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ऊस, केळी व फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना दुष्काळी अनुदान व पीकविमा भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनानुसार, पावसाअभावी शेती पिकांना पुरेसे पाणी मिळाले नाही. केळी पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यात उजनी जलाशयातून पाणीपुरवठा कमी झाल्याने पिकांच्या गुणवत्तेवर विपरीत परिणाम झाला आहे. परिणामी, केळीला बाजारात कमी दर मिळत असून उत्पादन खर्चही भरून निघणे कठीण झाले आहे.

ऊस पिकाची स्थितीही गंभीर असून, निवेदनात दिलेल्या माहितीनुसार एकरी अपेक्षित ६० ते ७० टन उत्पादनाऐवजी केवळ १५ ते २० टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री व कृषिमंत्री यांनी सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले असताना करमाळा तालुक्यातील ऊस, केळी व फळबागांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाचे दुष्काळी अनुदान आणि पीकविमा भरपाई मिळवून द्यावी, अशी विनंतीही निवेदनातून करण्यात आली आहे.

या निवेदनावर अविनाश मारुती सरडे, शंकर रामचंद्र बोंद्रे, इन्नुस दिलावर सय्यद, सचिन अनंतराव गावडे, योगेश दत्तात्रय सरडे, अशोक किसन घोगरे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, सोलापूर आणि राज्याचे कृषिमंत्री यांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

.

.

