सौंदे येथे चोरी; गुन्हा दाखल
करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील सौंदे येथे बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १ लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मंगळवारी (ता. १३ ऑक्टोबर) घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सौंदे येथील दिगंबर सिद्धु आवटे यांनी करमाळा पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजण्याच्या दरम्यान आवटे कुटुंबीय घराला कुलूप लावून शेतातील कामासाठी गेले होते. दुपारी घरी परतल्यानंतर घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि दरवाजा अर्धवट उघडा असल्याचे निदर्शनास आले. घरातील बेडरूममधील कपाटही उघडलेले होते आणि त्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते.

घराची तपासणी केली असता, सोन्याचे गंठण, वेलांची जोडी, झुमक्यांची जोडी आणि दोन सोन्याच्या अंगठ्या असे एकूण १ लाख ९० हजार ६०० रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याचे आढळले.

आवटे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०५(अ) आणि ३३१(३) अन्वये गुन्हा नोंद केला असून करमाळा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.
