October 27, 2026
IMG-20261020-WA0067

पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करमाळ्यात महायुतीचा मेळावा

करमाळा, विशाल परदेशी – पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाचे उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि कौस्तुभ गावडे यांना सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक वारसा असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत पदवीधर आणि शिक्षक मतदारांमध्ये उत्साह दिसून येत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी केले. पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या माहितीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ करमाळा शहरातील महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रांगणात मंगळवार दिनांक 20 रोजी सायंकाळी सात वाजता महायुतीचा मेळावा संपन्न झाला, या मेळाव्यात पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे बोलत होते.

यावेळी पुणे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या बाबत बोलताना नामदार गोरे यांनी सांगितले की, शिक्षकांचा आमदार प्रतिनिधी शिक्षकच हवा या मागणीमुळे गावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बापूजी साळुंखे यांच्या स्वामी विवेकानंद शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असताना गावडे यांना स्व-अर्थसहाय्यित संस्थांसह शिक्षकांच्या अडचणींचा मोठा अभ्यास आहे. आतापर्यंतचे शिक्षक प्रतिनिधी निवडून गेल्यानंतर त्यांनी शिक्षकांच्या अडचणींकडे कधीही पाहिलेले नाही. मात्र गावडे यांना मुख्यमंत्र्यांनीच उमेदवारी दिल्याने निवडून आल्यानंतर ते शिक्षकांचे प्रश्न थेट मुख्यमंत्र्यांसमोर विनासायास मांडू शकणार आहेत.

पुणे पदवीधर मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्मिता जाधव यांच्याबाबत बोलताना ना.गोरे यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात मोठे नाव असलेले डी वाय पाटील यांच्या त्या नात आहेत. यासोबतच पिंपरी (पुणे) येथील डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाच्या त्या प्रो-चांसलर आणि ‘डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटी’च्या सचिव आहेत. त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ४०, हजारांहून अधिक विद्यार्थी आणि शिक्षकांपर्यंत पोहोचून कार्य केले आहे. शिक्षणाचा अनुभव आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न माहीत असल्याने त्यांना न्याय देण्याची ताकद डॉ. जाधव यांच्यात असल्याचे नामदार गोरे यांनी आपल्या भाषणातून सांगितले.

सरकार म्हणजे पर्यायाने मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे दोन्ही उमेदवार असल्याने शिक्षक आणि पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी या दोन्ही उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मत देऊन यांना निवडून आणण्याचे आवाहन शेवटी ना. गोरे यांनी केले.

यावेळी विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, विधान परिषदेचे आ. राजाभाऊ राऊत, करमाळा तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.आ. जयवंतराव जगताप यांनीही आपल्या मनोगतातून महायुतीच्या दोन्ही उमेदवारांना पाठबळ देण्याचे आवाहन केले.

या मेळाव्याला भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, दिग्विजय बागल, माजी प्राचार्य जयप्रकाश बिले, करमाळ्याचे उपनगराध्यक्ष अतुल फंड, करमाळा पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, शंभूराजे जगताप यांच्यासह करमाळा शहर व तालुक्यातील महायुतीचे अनेक पदाधिकारी आणि शिक्षक तसेच पदवीधर मतदार उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!