नगोर्ली येथे संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक; जनसुनावणी घेण्याची मागणी
करमाळ, प्रतिनिधी – उजनी धरणावर प्रस्तावित तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, ग्रीन हायड्रोजन प्रकल्प, एआय डेटा सेंटर आणि लघु मॉड्युलर अणुभट्टी असे तब्बल १ लाख ६५ हजार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असलेले चार प्रकल्प प्रस्तावित आहेत. या प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी नगोर्ली येथील फार्महाऊसवर करमाळा, माढा व इंदापूर तालुक्यांतील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांची बैठक पार पडली.

यावेळी बोलताना मा.आ. शिंदे यांनी सांगितले की, विकासाला कोणाचाही विरोध नाही; मात्र शेतकरी-मच्छीमारांच्या हितही शासनाने लक्षात घेतले पाहिजे. या प्रकल्पांचे फायदे, त्यांना आवश्यक असलेल्या पाण्याची गरज आणि या प्रकल्पांचे शेती, मत्स्यव्यवसाय व पर्यावरणावरील संभाव्य परिणाम शासनाने स्पष्ट करावेत. यासाठी जनतेला विश्वासात घेऊन शासनाने जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी माजी आमदार संजय मामा शिंदे यावेळी बोलताना केली.

या बैठकीत ॲड. अजित विघ्ने, कृष्णा ताटे (सर), संदीप माने, सौरभ आरकिले, अविनाश सरडे, निलेश देवकर, अक्षय यादव, नंदकुमार नगरे, सीताराम नगरे, सुभाषआबा गुळवे आदींनी या प्रकल्पांबाबत भूमिका व्यक्त करत 31 तारखेला असलेल्या आंदोलनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या बैठकीला राष्ट्रवादीचे करमाळा तालुकाध्यक्ष भरत अवताडे, राजेंद्र धांडे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, चंद्रकांत सरडे, रोहिदास सातव, तानाजी झोळ, गौरव झांजुर्णे, सुजित बागल, सुभाष अभंग, अशपाक जमादार, मानसिंग खंडागळे, उदयसिंह देशमुख, सचिन गावडे, सोमनाथ रोकडे, ॲड. जालिंदर बसळे, नानासाहेब लोकरे, उमेश इंगळे, नितीन खटके, रवींद्र वळेकर यांच्यासह कर्मा माढा आणि इंदापूर तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

डॉ. विकास वीर यांनी या बैठकीचे सूत्रसंचालन केले. उजनीचे पाणी, शेतकऱ्यांचे भविष्य आणि मच्छीमारांची उपजीविका सुरक्षित ठेवण्यासाठी एकजुटीने लोकशाही मार्गाने आवाज उठवण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.

.

