October 27, 2026
IMG-20261026-WA0055

शुक्रवारी जेऊर येथे आढावा बैठक

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील पाणी टंचाई व दुष्काळ परिस्थिती बाबत गावनिहाय माहिती जाणून घेण्यासाठी करमाळा मतदार संघाचे आमदार नारायणआबा पाटील यांनी आढावा बैठक बोलावली आहे. शुक्रवारी दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता जेऊर येथे करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे आणि माढ्याचे तहसीलदार संजय भोसले यांच्या उपस्थितीत आणि आमदार नारायणआबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडणार आहे.

या बैठकीत ऑक्टोबर ते जुलै २०२७ पर्यंत लोकांच्या पिण्याच्या पाण्याची सोय, गुरांसाठी चारा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय, चारा छावण्या आणि पाणी टॅंकर आदीबाबत गावनिहाय माहिती घेऊन अहवाल तयार करण्यात येणार आहे. यामुळे करमाळा तालुक्यातील दुष्काळ निवारण संबंधी सर्वच विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची उपस्थिती या बैठकीसाठी अत्यावश्यक करण्यात आली आहे. या बैठकीस करमाळ्यासह माढा तालुक्यातील गटविकास अधिकारी पंचायत समिती, तालुका कृषी अधिकारी, उप अभियंता जलसंधारण विभाग सोलापूर, उपविभागीय अधिकारी महावितरण बार्शी, पशुधन विस्तार अधिकारी करमाळा, लघु पाटबंधारे करमाळा, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग करमाळा, पाटबंधारे विभाग करमाळा, सहायक निबंधक करमाळा, कुकडी डावा कालवा करमाळा, सार्वजनिक बांधकाम विभाग करमाळा, भीमा सिंचन उपविभाग करमाळा, कुकडी डावा कालवा कोळवडी, जीवन प्राधिकरण शाखा करमाळा आदिसह सर्वच विभागातील प्रमुखांना प्रतिनिधी न पाठवता स्वतः हजर राहण्याचे आदेश तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी दिले आहेत.

यामुळे शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १०:०० वाजता जेऊर येथील बाजार तळावरील सभागृहात होणाऱ्या या बैठकीकडे सर्वसामान्य शेतकऱ्यांचे डोळे लावून राहिले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या पदाधिकाऱ्यांनाही या बैठकीबाबत कळविण्यात आलेले असून आमदार नारायणआबा पाटील हे पाणी टंचाई व दुष्काळ निवारण या करीता अलर्ट मोड वर आल्याचे दिसून येत आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!