May 6, 2026
IMG-20260427-WA0037

२ दिवसांत पाणी न सोडल्यास भरत अवताडे यांचा आंदोलनाचा इशारा

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन १००/११० दिवस चालले, अशा बातम्या माध्यमांतून झळकत असल्या तरी या आवरताना पासून पूर्व भागातील अनेक गावे अद्याप वंचित असल्याचे सांगत पंचायत समिती सदस्य भरतभाऊ अवताडे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

याबाबत अवताडे यांनी कुकडी डावा कालवा उपविभाग क्र.१२ चे उप अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या २ महिन्यांपासून दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू असले तरी लाभक्षेत्रातील व हिसरे पंचायत समिती गणातील सौंदे, शेलगाव (क), फिसरे, हिसरे, अर्जुननगर आदी गावांना पाणी मिळालेले नाही. याविषयी अवताडे यांनी सदर कार्यालयाच्या अधिकाऱ्यांशी वारंवार चर्चा केलेली आहे, परंतु अद्यापही या गावांना पाणी मिळालेले नाही.

रब्बी आणि उन्हाळी आवर्तन सलग ३ महिने चालल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून वाचायला मिळत असताना हिसरे गणातील उपरोक्त गावांना मात्र एक थेंबही पाणी मिळालेले नाही. हे पाणी कुठे मुरले किंवा या गावांवर अन्याय का होत आहे? या प्रश्नांची लेखी उत्तरे संबंधित अधिकाऱ्यांकडून मिळणे अपेक्षित असल्याचे अवताडे यांनी या निवेदनात म्हटले आहे.

येत्या २ दिवसांमध्ये सदर गावांना पाणी मिळाले नाही तर करमाळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.२९ एप्रिल २०२६ रोजी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही अवताडे यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!