April 13, 2026
IMG-20260324-WA0052

पंचायत समिती कार्यालयात सीसीटीव्ही बसवणार

करमाळा, प्रतिनिधी – करमाळा पंचायत समिती काबीज केल्यानंतर भाजपा नेते दिग्विजय बागल यांनी मंगळवारी पंचायत समिती कार्यालय विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. अधिकारी व कर्मचारी यांनी एजंट विरहित आणि कसल्याही प्रकारची आर्थिक मागणी न करता कामे करण्याच्या कडक सूचना यावेळी बागल यांनी दिल्या.

पंचायत समिती निवडणूक नंतर मंगळवारी पहिल्यांदाच बागल यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी पंचायत समितीच्या सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधत सर्वसामान्य जनता आणि प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय असणे गरजेचे असल्याचे त्यांनी निक्षून सांगितले. सामान्य नागरिकांची कामे वेळेत पूर्ण होणे हा त्यांचा हक्क आहे आणि त्यात जाणीवपूर्वक दिरंगाई खपवून घेतली जाणार नसल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले. यावेळी पंचायत समिती आवारात विविध कामे घेऊन आलेल्या जनसामान्यांशीही संवाद साधून बागल यांनी त्यांच्या कामाबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना कामे तप्तरतेने करून देण्यास सांगितले. यासोबतच पंचायत समिती कार्यालयात असलेल्या रिक्त जागाच्या भरतीबाबतही पालकमंत्री ना. जयकुमार गोरे यांच्यासह वरिष्ठांकडे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पंचायत समिती कार्यालयाच्या भेटीदरम्यान दिग्विजय बागल यांनी गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम यांच्याशी चर्चा केली. विविध प्रवर्गांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती पंचायत समिती कार्यालयासह विविध गावांमध्ये बॅनर स्वरूपात लावल्या जाण्याची व्यवस्था करण्याच्या तसेच पंचायत समितीच्या कामकाजात पारदर्शकता येण्यासाठी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आणि सामान्य जनतेसाठी शुद्ध पिण्याचे पाणी आणि महिला व पुरुषांसाठी वेगवेगळ्या सार्वजनिक स्वच्छतागृहांची आवश्यकता असल्याने या बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश बागल यांनी यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना दिले.

या आढावा बैठकीवेळी पंचायत समितीच्या सभापती पूजा ढेरे, उपसभापती ॲड. आजिनाथ विघ्ने, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, गणेश चिवटे, चंद्रशेखर जोगळेकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

लोकनेते स्व. दिगंबरराव बागल यांनी आम्हाला कायमच पारदर्शक आणि निस्वार्थ लोकसेवेचे संस्कार दिले आहेत. त्यांच्याच विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेत, करमाळा पंचायत समितीचे कामकाज हे पूर्णपणे भ्रष्टाचारमुक्त आणि सर्वसामान्यांच्या हिताचे राहील, प्रशासकीय यंत्रणेने सर्वसामान्य जनतेसाठी काम करावे, कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळेल याची दक्षता घेतली जावी, अशी आमची आग्रही भूमिका आहे.
-दिग्विजय बागल,
भाजपा नेते करमाळा.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *