अत्यवस्थ तरुणावर सोलापूरात उपचार
करमाळा, प्रतिनिधी – करमाळा तालुक्यातील देवळाली येथे मंगळवारी सायंकाळी राहत्या घराला लागलेल्या आगीत गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे मजुरी करणाऱ्या कुटुंबाचा संसार मोडून पडला आहे. या भीषण आगीमुळे मजूर दांपत्याच्या पगार व बचतीसह इतर संसारोपयोगी साहित्य आणि मुलांचे शालेय साहित्य जळून बेचिराख झाले आहे. याशिवाय लागलेली आग विझवण्याच्या प्रयत्नात असलेल्या दांपत्यापैकी कर्त्या पुरुषाला भाजल्यामुळे सोलापूर येथे हलवण्यात आले आहे.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की, देवळाली येथील बाळू अनंता दामोदरे पोकलेन मशीन ऑपरेटर आहेत. त्यांच्या अर्धांगिनी शितल या करमाळा शहरातील कापड दुकानात काम करून संसाराला हातभार लावतात. दिवसभराच्या कामानंतर मंगळवारी सायंकाळी ६:३० च्या सुमारास बाळू हे घरासमोर बसले असताना आणि शितल या स्वयंपाक करत असताना अचानक त्यांच्या कुडाच्या झोपडीला मोठी आग लागली. काय घडतेय याचा अंदाज येईपर्यंत या आगीने रौद्र रूप धारण केले. तरीही प्रसंगावधान राखून दामोदरे दाम्पत्याने ही आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. या आगी दरम्यान दामोदरे यांच्या झोपडीतील गॅसच्या स्फोटामुळे झालेला मोठा आवाज ऐकून जवळपासचे तरुणही ही आग विझवण्यासाठी धावले. आगीचे स्वरूप पाहता देवळाली येथील पत्रकार प्रफुल्ल दामोदरे यांनी त्वरित करमाळा नगरपालिकेच्या अग्निशमन दलास पाचारण केले. मात्र अग्निशामक बंब कुर्डूवाडी कडील कॉल वर गेल्याने तो उपलब्ध होऊ शकला नाही. एव्हाना घटनास्थळी जमलेल्या तरुणांनी शेजारील बोअरला पाईप जोडून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. तब्बल एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आली.

ही आग विझल्यानंतर दामोदरे दांपत्याने घटनास्थळी आपल्या मौल्यवान वस्तूंचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता या दोघांच्या पगारीसह बचत म्हणून घरात ठेवलेली रक्कम, इतरांच्या शेतात काम करून वाट्याला आलेले धान्य, ठेवणीच्या कापडांसह इतर सर्व कपडे, ओळखपत्रांसह इतर कागदपत्रे आणि चिमुकल्यांचे शालेय साहित्यासह सर्व काही या आगीत नष्ट झाल्याचे पाहून शितल यांनी हंबरडा फोडला. आग विझवताना बाळु यांच्या चेहऱ्यासह डाव्या हाताला भाजल्यामुळे त्यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सुदैवाने दामोदरे कुटुंबातील सागर आणि ईश्वरी हे घराबाहेर खेळत असल्याने

अंगावरच्या कपड्यां शिवाय आता या कुटुंबाकडे काहीही उरलेले नाही. कष्टाने उभा केलेला संसार काही मिनिटांत मातीमोल झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण देवळाली गावात हळहळ व्यक्त होत असून ग्रामस्थांनी आपापल्या परीने या कुटुंबाला रोख रकमेच्या स्वरूपात मदत करण्यास सुरुवातही केली आहे. शासनाने आणि समाजातील दानशूर व्यक्तींनी या निराधार झालेल्या कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

दरम्यान मंगळवारी रात्री करमाळा तहसील कार्यालयाचे पुरवठा निरीक्षक शत्रुघ्न चव्हाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. बुधवारी सकाळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनीही आगीच्या ठिकाणी पाहणी करून अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीला तोंड देण्यासाठी तातडीच्या मदतीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे.

.

.

