May 6, 2026
IMG-20260415-WA0028

विहाळ येथील घटना

करमाळा, प्रतिनिधी – पक्षाघात झालेल्या आजीचे हात पाय मोडून व दगडावर डोके आपटून सख्या नातीनेच खून केला आहे. करमाळा तालुक्यातील विहाळ येथे शनिवारी रात्री उशिरा ही घटना घडली आहे.

याबाबत पोलीस हवालदार दिपक घोरपडे यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली असून या फिर्यादीत म्हटले आहे की, विहाळ येथील मनिषा रविंद्र लवंगारे हिने तिची पक्षाघात झालेली आजी जनाबाई भगवान सुरवसे (वय-८२ वर्षे, रा. विहाळ ता. करमाळा जि. सोलापुर) ही वारंवार किरकिर करते, या कारणावरून दि. ११/०४/२६ रोजी रात्री ११.३० ते ११.४५ वाजण्याच्या दरम्यान शिवीगाळ करून व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून व तिचे डोके भिंतीमध्ये रोवलेल्या दगडावर आपटुन तिला ठार मारले आहे.

मयत जनाबाई सुरवसे या सात वर्षांपासून पक्षाघात झाल्यामुळे घरात पडून होत्या. घरातील लोक त्यांचा सांभाळ करत असताना जनाबाई यांची मुंबई येथील नात मनीषा लवंगारे ही सुद्धा गावी आल्यावर जनाबाई यांचा सांभाळ करीत असे. या बदल्यात मनीषाने तिच्या आजोबांकडून अर्धा एकर जमीन नावावर करून घेतली होती. तरीही ती जनाबाई यांचा व्यवस्थित सांभाळ करत नसल्याने जनाबाई व मनीषा यांच्यात नेहमी वाद होत असत.

याच वादातून दि.११/०४/२६ रोजी रात्री १० वाजता मनीषा ही जनाबाई यांना मारहाण व शिवीगाळ करत असल्याने जनाबाई यांच्या सूनेने आपत्कालीन नंबरवर कॉल केल्यानंतर पो.हे.कॉ. शेख व पो.कॉ. पवार यांनी जनाबाई सुरवसे यांची विचारपूस केली होती. त्यावेळी पोलिसांनी मनिशा लवंगारे हिला जनाबाई यांना त्रास न देण्याची तंबी दिली होती. मात्र पोलिस परत जाताच निर्दयी मनीषाने आजी जनाबाईला मारहाण केली व आजीचा जीव घेतला.

पो.ह. घोरपडे यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनिषा लवंगारे हिच्यावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१), ११५(२) व ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. अटकेनंतर करमाळा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दिला शुक्रवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर दळवी हे या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!