लिंबू मिरची उतरवून आणि लिंबाच्या पानांचं तोरण बांधूनही नजर बाधा उतरेना; आषाढाचा नैवेद्य दाखवण्याची वेळ येतेय का
करमाळा, प्रतिनिधी – १५ नवीन बसेस दाखल होऊनही करमाळा बस आगाराला कोणताच फरक नसल्याचे दिसून येत आहे. विविध कारणांनी विविध मार्गांवर बसेस बंद पडण्याचे सत्र सुरू असताना मार्गावर बस बंद पडू नये म्हणून मागील आठवड्यात एका विद्यार्थिनीने करमाळा-कर्जत बसला लिंबाच्या पाल्याचे तोरण बांधून लिंबू मिरचीने नजर उतरवली होती. मात्र तरीही करमाळा आगारातून शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता कर्जतकडे निघालेली बस रावगाव येथे थेट खड्ड्यात गेल्याने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे भोग संपेनात अशी चिन्हे दिसत आहेत.

करमाळा आगारातील ढिसाळ कारभाराचा अनुभव प्रवासी रोजच घेत असतात. सक्षम वरिष्ठ अधिकारी नसताना आणि असतानाही करमाळा बस आगाराच्या कारभारात काहीच सुधारणा होत नाही. अधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने वेगवेगळ्या मार्गांवर बस बंद पडण्यासह अनपेक्षित बिघाड होऊन प्रवाशांच्या जीवाशी खेळ होण्याचेही बरेच प्रसंग प्रवाशांनी अनुभवले आहेत. गेल्या वर्षीच कर्जत होऊन करमाळ्याकडे येणाऱ्या बसने रावगाव नजिक लिंबाच्या झाडाला धडक देऊन ती पलटी झाली होती. यात काही प्रवासी जखमी ही झाले होते. याशिवाय मागील महिन्यात करमाळा-वाशिंबे मार्गावर निघालेल्या बसची डिझेल टाकी करमाळा शहरातच सिद्धार्थनगर भागात निखळून रस्त्यावर पडली होती.

याशिवाय कोलमडलेले वेळापत्रक, कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या, नादुरुस्त बसेस, सामान्य प्रवासी आणि विद्यार्थ्यांसोबत सोमवादा दरम्यान वाहक आणि कर्मचाऱ्यांचा उद्धटपणा, आगारातील अस्वच्छता अशा अनेक समस्यांना अनेक वर्षांपासून करमाळा आगारातून प्रवास करणारे प्रवासी तोंड देत आहेत. वाहकाच्या उद्धटपणा बाबत आगारप्रमुखांशी वाहकाचे बोलणे करून दिल्यानंतर आगार प्रमुखांची सूचना हलक्यात घेतल्याचा नुकताच अनुभव आलेला आहे. याशिवाय दिनांक 13 रोजी गौंडरे मार्गावरील बस रात्री उशिरा सुटल्याने रात्रीच्या अंधाराच्या भीतीने विद्यार्थिनीने काही अंतर पुढे सोडण्याची विनंती करूनही वाहक आणि चालकाने तिची विनवणी धुडकावून लावल्याने ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ या ब्रिदाला कर्मचारी कितपत पाळतात हा संशोधनाचा विषय आहे.

आषाढी वारीतील महत्त्वाची असलेल्या संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीचे कर्जत-रावगाव मार्गाने करमाळ्यात उद्या आगमन होणार आहे. सुदैवाने ही बस आज (शुक्रवारी) रावगाव येथे खड्ड्यात गेली असली तरी उद्या असा प्रकार घडला तर जेजुरी घटनेची नक्कीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.

संतश्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराज पालखीच्या आगमन सोहळ्याची कर्जतसह करमाळा तालुक्यात प्रशासनासह नागरिक व ग्रामस्थांची तयारी सुरू आहे. ही तयारी सुरू असताना एसटीच्या ढिसाळ कारभाराविरोधात युवासेना आज आगार प्रमुखांच्या दालनात ठिय्या आंदोलनाची तयारी करत आहे, आणि ही तयारी सुरू असतानाच करमाळा कर्जत मार्गावरील बस रावगाव येथे खड्ड्यात जाण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही अनुचित घटना घडली नसली तरी करमाळा बस आगार प्रवाशांना किती महत्त्व देते, याचे अनुभव मात्र वरचेवर वाढत चालले आहेत.

.

.

.

.

.

