April 12, 2026
IMG-20260326-WA0091

करमाळा पोलीसांची कामगिरी

करमाळा, प्रतिनिधी – मोटार सायकलवरून सोन्याचे गंठण हिसकावणाऱ्या आरोपीचा शोध घेऊन करमाळा पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील ऐवज हस्तगत केला असल्याची माहिती करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी दिली आहे. अधिक तपासा दरम्यान या आरोपीवर अहिल्यानगर जिल्ह्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याचे दिसून आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती देताना पोलीस निरीक्षक माने यांनी सांगितले आहे की, दि. १३/०३/२०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या मिना माणिक मैड (रा. शेळगाव, ता. परांडा, जि. धाराशिव या शहरातील मंगळवार पेठ येथील डॉ. घाडगे हॉस्पिटलकडे जात होत्या. यावेळी त्या महादेव मंदिराजवळ आल्या असताना मोटर सायकलवरून आलेल्या दोघांपैकी पाठीमागे बसलेल्याने मैड यांच्या गळयातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावले व दोन्ही आरोपींनी पोबारा केला होता. याबाबत मिना मैड यांनी करमाळा पोलिसात त्यांचे १.७५ तोळे वजनाचे सोन्याचे एकुण २,५३,७५०/- रू किंमतीचे मिनी गंठन मोटारसायकल वरून आलेल्या दोन अज्ञातांनी हिसकावुन नेल्याबाबत फिर्याद दिली होती.

हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून सीसीटीव्ही फुटेजमध्ये लखन उर्फ फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा, नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर) हा असल्याचे निष्पन्न केले. यानंतर त्यांनी करमाळा पोलीसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला सुचना व मार्गदर्शन करून निष्पन्न आरोपी पकडण्यासाठी पथक रवाना केले. हे पथक आरोपीच्या मागावर असताना गोपनीय बातमीदार व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या पथकाने आरोपी लखन उर्फ फिरोज अजिज शेख (रा. नेवासा फाटा, मुकिंदपुर, नेवासा ता. नेवासा जि. अहिल्यानगर) याला ताब्यात घेतले. सदर आरोपीकडे अधिक तपास केला असता त्याने नमुद गुन्हयाची कबुली देवुन चोरलेल्या सोन्याच्या गंठण पैकी १०.७८० मिली वजनाचे रू. १,३५,८२८ किंमतीचे अर्धवट सोन्याचे गंठण काढुन दिले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे.

पो.हे.कॉ. पांडुरंग आरकीले हे या गुन्हयाचा अधिक तपास करत असून लवकरच गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर आरोपींना पकडून त्यांच्याकडून उर्वरित ऐवज हस्तगत करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक माने यांनी दिली आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही. एस., करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ. पांडुरंग आरकिले, पो.हे.कॉ. अजित उबाळे, पो.ना. मनिष पवार, पो.ना. वैभव ठेंगल, पो.कॉ. रविराज गटकुळ, पो.कॉ. अर्जुन गोसावी, पो.कॉ. हनुमंत भराटे, पो.कॉ. अमोल रंदिल, पो.कॉ. गणेश खोटे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पो.हे.कॉ. व्यंकटेश मोरे यांनी केली आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *