गुन्ह्यात नाथबाबा सह ड्रायव्हरचा सहभाग
करमाळा, प्रतिनिधी – आतापर्यंतच्या दाखल सहा गुन्ह्यांमध्ये पोलीस कोठडी आणि न्यायालयीन कोठडी अशा गटांगळ्या खाणाऱ्या मनोहर मामा आणि त्याच्या साथीदारांना न्यायालयाने काही दिवसांपूर्वीच न्यायालयीन कोठडी दिली होती. गुन्ह्यांच्या गर्तेत बुडत जाणाऱ्या भोंदू बाबाला या आदेशाने तारले असले तरी करमाळ्यात गुरुवारी त्याच्यावर दाखल झालेल्या बलात्काराच्या नवीन गुन्ह्यामुळे त्यांनी साथीदारांसह पुन्हा गटांगळी खाल्ली आहे.

याबाबत ३५ वर्षीय पिडीत महिलेने दि. ०२/०७/२०२६ रोजी करमाळा पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, २०२४ मध्ये फिर्यादीच्या बहिणीच्या पतीला किडनीचा आजार झाला असल्याने व मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले या नावाचे महाराज बाळुमामाचे अवतार आहेत ते आजार बरा करतील अशी माहिती मिळाल्याने फिर्यादी या आरोपी याचे मठामध्ये गेल्या व मनोहर महाराज यांना भेटण्यासाठी ११,०००/- रु. ची पावती केली.

यावेळी मनोहर भोसले याने फिर्यादीला पांढऱ्या रंगाची पावडर देऊन बहिणीच्या पतीला ती पाण्यातुन व जेवणातुन देण्यास सांगितले. त्यानंतर फिर्यादी प्रत्येक अमावस्येला घोटी येथील मठामध्ये गेल्या असता मनोहर भोसले याने फिर्यादी यांच्या बहिणीच्या पतीचा आजार बरा करण्यासाठी प्रत्येक अमावस्येला ५१,०००/- रु. असे एकुण १,६४,०००/- रु. घेतले. तरीदेखील फिर्यादी यांच्या बहिणीच्या पतीला फरक न पडल्याचे फिर्यादीने मनोहर भोसले यास सांगितले. त्यानंतर मनोहर भोसलेने फिर्यादीला तुमची शुध्दी करावी लागेल व होमहवन करावे लागेल, तरच तुमच्या बहिणीच्या पतीला फरक पडेल, पुढच्या अमावस्येला येताना उशीरा या म्हणजे दर्शनाकरीता आलेले सर्व भक्त गेल्यानंतर तुमची शुध्दी व होमहवन करु, असे सांगितले.

त्याप्रमाणे फिर्यादी २०२४ मधील एका अमावस्येला सायंकाळी ०७:०० वा. मठामध्ये जाऊन नाथबाबास भेटल्या. त्यानंतर रात्री १२:०० वा. चे सुमारास नाथबाबा फिर्यादीला एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्या खोलीमध्ये मनोहर भोसले याने मंत्रोच्चार केला व फिर्यादी यांना म्हणाला की, मला बाळुमामा स्वतः बोलले आहेत की, तुम्ही आता माझेसोबत शारिरीक संबंध ठेवा तरच तुमची शुध्दी होवुन तुमचे दाजी बरे होतील. त्यावेळी फिर्यादी यांनी त्यास नकार दिला असता मनोहर भोसले याने फिर्यादी यांना एका ग्लासमध्ये पाणी पिण्यास दिले. फिर्यादी यांनी ते पाणी पिल्यानंतर त्या बेशुध्द पडल्या. काही वेळानंतर फिर्यादी यांना शुद्ध आली त्यावेळी मनोहर भोसले याने त्यांचेसोबत जबरदस्तीने शारिरीक संबंध केले.

या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले, नाथबाबा उर्फ विशाल शहाजी वाघमारे व अनोळखी चालक या तिघांविरुध्द भा.न्या.सं. कलम ६४(१), ३१८(२), ३१८(४), ३५१(२), ३(५) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम सन २०१३ चे कलम ३(२), ३(३) प्रमाणे बलात्कार, फसवणुक व जादुटोणा केल्याबाबतचा गुन्हा दाखल केला आहे. स.पो.नि. बालाजी वळसने हे या गुन्हयाचा अधिक तपास करीत आहेत.

.

.

.

.

