April 11, 2026
IMG-20260407-WA0020

महापुरुषांच्या प्रतिमा बसवण्याची तयारी सुरू असल्याची सभापतींची स्पष्टोक्ती

करमाळा, प्रतिनिधी – भाजपा राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून करमाळा पंचायत समितीवर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर पंचायत समितीच्या सभापती कार्यालयात सत्ताधाऱ्यांकडून आपापल्या गटनेत्यांच्या प्रतिमा लावण्याची चढाओढ लागलेली दिसून येत असली तरी या कार्यालयात पूर्वी असलेल्या महापुरुषांच्या प्रतिमा दिसून येत नसल्याने करमाळा तालुका विकास आघाडीच्या समर्थकांनी सोमवारी करमाळा पंचायत समितीच्या सभापती कार्यालयास महापुरुषांच्या प्रतिमा भेट देत कार्यालयात महापुरुषांच्या प्रतिमा असाव्यात याची आठवण करून दिली.

करमाळा पंचायत समितीवर पाटील गटाचे वर्चस्व असतानाच्या काळात सभापती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्यात आलेल्या होत्या. दरम्यानच्या काळात कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात आले आणि यावेळी या कार्यालयातील सर्व प्रतिमा काढण्यात आल्या होत्या. यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका पार पडल्या आणि भाजपा-राष्ट्रवादी युतीच्या माध्यमातून बागल आणि मा.आ. शिंदे गटाचे प्रत्येकी दोन जिल्हा परिषद सदस्य आणि प्रत्येकी चार पंचायत समिती सदस्य निवडून आले. या निवडणुकीत एकाकी लढत दिलेल्या विद्यमान आमदार पाटील गटाच्या करमाळा तालुका विकास आघाडीचेही दोन जिल्हा परिषद सदस्य आणि चार पंचायत समिती सदस्य निवडून आले.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक निकालानंतर झालेल्या जल्लोषा वेळी बागल गटाकडून दिवंगत सामाजिक न्याय व राज्यमंत्री दिगंबरराव बागल यांची प्रतिमा पंचायत समिती सभापती कार्यालयात लावण्यात आली होती. यानंतर सभापती व उपसभापती निवडीनंतर भाजपा समर्थकांनी स्व. दिगंबरराव बागल आणि भाजपा नेत्या रश्मी बागल यांच्या तर राष्ट्रवादीच्या समर्थकांनी स्व. अजित दादा पवार आणि मा. आ. संजयमामा शिंदे यांच्या मोठ्या आकारातील प्रतिमा सभापती कार्यालयात लावल्या होत्या. यानंतर एक महिना उलटून गेला तरी या कार्यालयात महापुरुषांचे फोटो दिसून येत नव्हते.

त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव जवळ आल्याचे लक्षात घेऊन मा. सभापती अतुल पाटील, मा. सभापती शेखर गाडे, माजी उपसभापती पै. दत्ता सरडे, माजी उपसभापती गहिनीनाथ ननवरे, विद्यमान पंचायत समिती सदस्य स्वप्नील काळे आदींनी एकत्र येत सोमवार दि.६ रोजी पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेवून पुष्पहार अर्पण केला.

विद्यमान आ. नारायणआबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली २०१७ मध्ये करमाळा पंचायत समितीवर पाटील गट कार्यरत असताना केवळ राजकारणासाठीच महापुरुषांचा आधार न घेता त्यांचा कायम आदर व्हावा या हेतूने करमाळा पंचायत समितीच्या सभापती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या होत्या. मध्यंतरी नूतनीकरणावेळी या प्रतिमा काढण्यात आल्या असल्या तरी पंचायत समितीवर वर्चस्व प्राप्त केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी केवळ आपापल्या गटाच्या पुढार्‍यांच्या प्रतिमा कार्यालयात लावण्यावर भर दिला. महापुरुषांच्या प्रतिमांचा मात्र यांना विसर पडला. त्यामुळे आम्ही सभापती कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा ठेऊन पुष्पहार अर्पण केला.
-पै. अतुल पाटील,
माजी सभापती तथा पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी, करमाळा.

नूतनीकरणानंतर सभापती कार्यालयात कोणत्याही प्रतिमा नव्हत्या. सभापती-उपसभापती निवडीनंतर नेत्यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या असल्या तरी महापुरुषांच्या मोठ्या प्रतिमा तयार करण्यास सांगितलेल्या असून येत्या दोन दिवसात या प्रतिमा कार्यालयात लावल्या जाण्याचे नियोजन होते. मात्र आ. पाटील समर्थकांनी याबाबत आमच्याकडे कोणतीही चौकशी न करता महापुरुषांच्या प्रतिमा आणल्या असल्या तरी त्यांच्या या सौजन्याचे स्वागत आहे.
-पूजा ढेरे,
सभापती, पंचायत समिती करमाळा.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *