नागरिकांनी पंपावर गर्दी करू नये -तहसीलदार शिल्पा ठोकडे
करमाळा, प्रतिनिधी – आखाती देशांतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा पुरवठा बंद होणार अशा अफवांमुळे राज्यातील महत्त्वाच्या शहरांमध्ये मंगळवारपासूनच नागरिकांची पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी दिसून येत आहे. या अफवांचे लोन आता करमाळ्यात पोहोचले असून बुधवारी दुपारपासून रात्री उशिरापर्यंत करमाळा शहर व परिसरातील पेट्रोल पंपांवर पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी नागरिकांनी आपली वाहने घेऊन गर्दी केली होती.
या खळबळीमुळे इंधनाच्या तुटवड्याबद्दल तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले आहे की, सध्या शासनाकडून किंवा तेल कंपन्यांकडून पेट्रोल व डिझेल तुटवडा असल्याबाबत अथवा पुरवठा खंडित होणार असल्याबाबत कोणतीही अधिकृत सूचना प्राप्त झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अनावश्यकपणे पेट्रोल पंपांवर गर्दी करू नये. अशा प्रकारच्या गर्दीमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणून सर्वांनी जबाबदार नागरिक म्हणून संयम बाळगून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन तहसीलदार ठोकडे यांनी केले आहे.
अफवेमुळे झालेल्या गर्दी समोर इंधन पंपावरील व्यवस्थापकांसह कर्मचारीही हतबल झाले आहेत. इंधनपुरवठा खंडित होण्याबाबत पंप चालकांनाही कोणतीही सूचना आली नसल्याचे सांगत कर्मचारी गर्दीतील नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र इंधन मिळणार नसल्याची अफवा असली तरी यदा कदाचित उद्या इंधन मिळाले नाही तर काय करायचे म्हणून इंधन भरून घेण्याची खबरदारी घेत आहेत. नागरिक इंधनासाठी पंपावर गर्दी करत असले तरी पंपातील भूमिगत टाक्यांत पूरेसे इंधन असून पंपावर उभे असलेल्या टँकरमध्येही इंधन आहे. परंतु तुटवड्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती नसल्याचे सांगितले तरीही नागरिक इंधन भरून घेण्यासाठी हुज्जत घालत आहेत. -ज्ञानेश पाटोळे, व्यवस्थापक, स्व. दिगंबररावजी बागल पेट्रोलियम, करमाळा.
.
.
.