सोहळ्यास तहसीलदार शिल्पा ठोकडे यांची प्रमुख उपस्थिती
करमाळा, प्रतिनिधी – लाकडी घाणा तेल उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रात नावाजलेल्या करमाळ्यातील अमृतधारा लाकडी घाणा तेल या उद्योगाचे नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर झाले असून, त्याचा उद्घाटन सोहळा गुरुवार दि. २६ मार्च २०२६ रोजी असलेल्या रामनवमीचे औचित्य सकाळी १० वाजून २० मिनिटांनी उत्साहात पार पडला.
मा.आ. जयवंतराव जगताप यांच्या हस्ते फीत कापून या नवीन जागेतील उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला करमाळा तहसिलदार शिल्पा ठोकडे यांच्यासह नगरसेवक व नगराध्यक्ष प्रतिनिधी संजय सावंत, उपनगराध्यक्ष अतुल फंड, नगरसेवक युवराज चिवटे, भाजपा शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, सामाजिक कार्यकर्त्या प्रियांका गायकवाड, करमाळा एस.टी. आगाराचे वाहतूक नियंत्रक पंकज जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. उद्घाटनानंतर मा.आ. जगताप, तहसीलदार ठोकडे यांनी लाकडी तेल घाणा उद्योगातील लाकडी घाण्यासह इतर प्रक्रिया यंत्रांची माहिती घेतली. परंपरागत तेल उत्पादन व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत क्षीरसागर परिवाराचे महारुद्र क्षीरसागर आणि सौ. सीमा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या स्नुषा (सुनबाई) सौ. ज्योती गणेश क्षीरसागर यांनी पाच वर्षांपूर्वी त्यांच्या कानाड गल्ली येथील राहत्या घरात लाकडी घाणा तेल उद्योगाची सुरुवात केली. स्वच्छता आणि शुद्धतेला महत्त्व देत करडी, सूर्यफूल, शेंगदाणा, खोबरे, तीळ, बदाम आदी तेलबियांचे गाळप करून उत्पादीत करण्यात आलेल्या या पारंपरिक पद्धतीच्या तेलांना राज्यभरातून मागणी आहे. याशिवाय तेलाच्या उत्पादनानंतर निघणारी पेंड ही दुभती जनावरे आणि बैलांच्या खाद्यासाठी सकस आहार म्हणून वापरली जाते. या मागणीचा विचार करून क्षीरसागर परिवाराने लाकडी घाणा तेल उद्योगाचे करमाळ्यातील सोलापूर-अ.नगर बायपास रोडवरील आराध्या हॉटेल शेजारी नवीन प्रशस्त जागेत स्थलांतर केले आहे.
या उद्घाटन सोहळ्यास करमाळा शहर व तालुक्यातील तिळवण तेली समाज, करमाळा एस.टी. आगारातील अधिकारी व कर्मचारी यांसह अनेकांनी उपस्थित राहून क्षीरसागर परीवाराच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. स्पर्धेच्या युगात तेलातील कोलेस्टेरॉल वाढीच्या नावाखाली विविध रासायनिक पद्धतींनी तेलाचे उत्पादन घेतले जाते. असे तेल आरोग्याच्या दृष्टीने कितपत योग्य आहे हे ठामपणे सांगता येत नसले तरी परंपरागत पद्धतीने काढलेले तेल हे आरोग्याच्या दृष्टीने चांगलेच आहे. महिलांच्या सक्षमीकरणाच्या काळात क्षीरसागर कुटुंबातील महिलांनी वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला परंपरागत लाकडी तेल घाण्याचा प्रकल्प अद्ययावत पद्धतीने सुरू करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक आदर्श निर्माण केला आहे. -शिल्पा ठोकडे, तहसिलदार, करमाळा. काळाच्या ओघात परंपरागत बैलाची तेल घाणी बंद पडल्याने तालुक्यातून तेलबियांच्या उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी कानाडोळा केला होता. अलीकडील काळात अद्ययावत लाकडी तेल घाण्यांच्या तेलाला ग्राहकांची पसंती वाढत आहे. त्यामुळे जिरायत भागातील शेतकऱ्यांनी इतर भुसार मालासोबतच भुईमूग, सूर्यफूल, करडी आदी पिकांकडे लक्ष घातले तर फायद्याचे ठरणार आहे. -मा.आ. जयवंतराव जगताप, सभापती, कृ. उ. बा. समिती, करमाळा.
.
.
.