कोंढार चिंचोली येथील एकावर गुन्हा
करमाळा, प्रतिनिधी – माढा विभागाच्या प्रांताधिकार्यांनी करमाळा तालुक्यातील कोंढार चिंचोली येथे मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्याला पकडून पुढील कारवाईसाठी करमाळा तहसील कार्यालयाच्या महसूल पथकाच्या ताब्यात दिले होते. मात्र कारवाई होण्यापूर्वीच या पठ्ठ्याने वाहनांसह पोबारा केला आहे.

याबाबत करमाळा तालुक्यातील कात्रज येथील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) प्रबुद्ध हरिदास माने यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माढा विभागाच्या प्रांताधिकारी जयश्री आव्हाड यांनी दि.२५/०३/२६ रोजी सायंकाळी उशिरा कोंढार चिंचोली येथील आकाश हनुमंत खांडेकर याला मुरुमाने भरलेल्या तीन ट्रॉल्या आणि ट्रॅक्टर सह पकडून पुढील कारवाई करिता महसूल पथकाच्या ताब्यात दिले होते. दरम्यान कारवाईसाठी करमाळ्याकडे आणले जात असताना खांडेकर याने ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टरला जोडलेल्या तीन ट्रॉल्या त्यातील सहा ब्रास मुरूम असा ५,१३,६०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन पलायन केले आहे.

माने यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी आकाश हनुमंत खांडेकर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमांसह पर्यावरण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पो.हे.कॉ. पवार हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

.

.

