करमाळा, प्रतिनिधी – सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार करमाळा उपविभागातील शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे, वाळू तस्करी तसेच अवैध धंद्यांमध्ये सक्रिय असलेल्या आणि परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. माढा विभागाच्या उपविभागीय दंडाधिकारी जयश्री आव्हाड यांनी करमाळा उपविभागातील तब्बल १७ गुन्हेगारांना हद्दपार करण्याचे आदेश जारी केले आहेत.

करमाळा, टेंभुर्णी आणि कुर्डुवाडी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करून त्यांच्या हद्दपारीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांनी संबंधित पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार प्रस्ताव तयार करून पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या मार्फत उपविभागीय दंडाधिकारी, माढा विभाग कुर्डुवाडी यांच्याकडे सादर करण्यात आले.

हद्दपार करण्यात आलेल्या १७ जणांमध्ये जयवर्धन उर्फ मुन्ना हनुमंत दैन (वांगी नं. १), ओंकार दत्तात्रय गव्हाणे (कुर्डुवाडी), नागेश शंकर लोंढे (टेंभुर्णी), करण कृष्णा आलाट (करमाळा), मारुती जनार्धन केचे (आलेगाव बु.), आगतराव लक्ष्मण काळे (अकोले बु.), हनुमंत बापू महाडीक (मुंगशी), धिरज अशोक जाडकर (मोडनिंब), बप्पा उर्फ शिवानंद मेघराज भोसले (बेंबळे), महेश उत्तरेश्वर गायकवाड (शेवरे), संजय हरिदास दरगुडे (चौभेपिंपरी), अजित नवनाथ पाटोळे (शेवरे), विकास रमेश काळे (चौभेपिंपरी), समाधान कल्याण जरक (टाकळी), रत्नमाला आगतराव काळे (अकोले बु.), विमल आगतराव काळे (अकोले बु.) आणि चेतन आण्णा काळे (बेंबळे) यांचा समावेश आहे.

सोलापूर ग्रामीण हद्दीतील शरीराविषयक व मालाविषयक गुन्हे, वाळू तस्करी आणि अवैध धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या इतर सराईत गुन्हेगारांचेही गुन्हेगारी अभिलेख तयार करण्यात आले असून, त्यांच्याविरुद्धही याच स्वरूपाची हद्दपारीची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी दिला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा व्ही. एस. यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने, कुर्डुवाडीचे पोलीस निरीक्षक अतुल मोहिते, टेंभुर्णीचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे तसेच संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईसाठी विशेष प्रयत्न केले.

.

