June 21, 2026
IMG-20260317-WA0027

करमाळा, प्रतिनिधी – सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरात पेट्रोल, डिझेल या इंधन टंचाईसह घरगुती एलपीजी गॅसचीही टंचाई मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. ग्रामीण भागातही त्याच्या झळा बसू लागल्या आहेत. यावर बायोगॅस हा शेतकऱ्यांसाठी एक शाश्वत पर्याय असून राष्ट्रीय बायोगॅस व खत व्यवस्थापन कार्यक्रमा अंतर्गत अनुदानाची सुविधा असलेला बायोगॅस प्रकल्प शेतकऱ्यांसाठी काळाची गरज असल्याने या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन शिवकस्तुर फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष सुजित बागल यांनी केले आहे.

या प्रकल्पाविषयी अधिक माहिती देताना बागल यांनी सांगितले आहे की, बायोगॅस व जैविक खतासह औषध निर्मितीच्या या प्रकल्पाचे मूळ मूल्य ५६,०००/- रूपये आहे. युनिट उभा करत असतानाच शासनाच्या CSR फंडामधून २४०००/- रूपये अनुदान वजा करून उर्वरित ३२०००/- रूपये रक्कम शेतकऱ्यांनी भरणे अपेक्षित आहे. ही रक्कम भरल्यानंतर व युनिट चालू झाल्यानंतर शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यानंतर अजून १६०००/- अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा होते. म्हणजे शेतकऱ्यांना हे युनिट फक्त १६०००/- रुपयांमध्येच मिळते.

या बायोगॅस युनिट मधून दिवसाला ९०० ग्रॅम गॅस तयार होतो. हा गॅस १० माणसाच्या कुटुंबाला दिवसभराचा स्वयंपाक बनवूनही शिल्लक राहतो. या युनिट मधून बाहेर पडणाऱ्या स्लरीचे लिक्विड आणि पावडर स्वरूपात शेतीसाठी खत तयार करता येते. स्लरी गाळून खाली जाणारे पाणी बॅरल मध्ये साठवून ते ठिबक मधून सोडण्यासाठी उपयोगी पडते.

अशाप्रकारे हा फक्त बायोगॅस प्रकल्प नाही तर या माध्यमातून वेगाने तयार होणारे उपयुक्त असे शेणखत ही आपल्याला मिळते. तसेच स्लरीही औषध म्हणून पिकांना ठिबक मधून सोडण्यासाठी किंवा फवारणीसाठी वापरता येते. त्यामुळे हा बायोगॅस व जैविक खत प्रकल्प घरोघरी बसवणे शेतकरी हिताचे असल्याचे बागल यांनी सांगितले आहे.

इरेसॉईल (Iresoil) अग्रोटेक या कंपनीच्या सहकार्यातून व शिवकस्तुर फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून करमाळा तालुक्यामध्ये हा प्रकल्प उभा करण्यासाठी सस्टेन प्लस एनर्जी फाउंडेशनचे संजय पिरंगुटे, Iresoil अग्रोटेकचे अमर पाटील, दीपक गवळी यांच्या सहकार्याने बायोगॅस प्रकल्प युनिट उभा करण्याचे काम सध्या सुरू असून ज्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपल्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सुजित बागल यांनी शेवटी केले आहे.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!