May 6, 2026
IMG-20260319-WA0012

राजकीय वरदहस्तामुळे तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्याची आशा

करमाळा, विशाल परदेशी – पारंपारिक राजकीय गटांच्या परस्परविरोधी कुरघोड्यांमुळे विकासाच्या बाबतीत करमाळा तालुका रसातळाला जात होता. मात्र करमाळा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूकीत केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेल्या पुढार्‍यांचे समर्थक निवडून आल्याने तालुक्यातील विकास कामांना भरघोस निधी मिळून सामान्य जनतेचे रखडलेले प्रश्न निकाली लागण्याची मोठी आशा निर्माण झाली आहे.

अलीकडील काळात लोकसभा ते नगरपालिका निवडणूक होईपर्यंत करमाळ्यात केंद्र किंवा राज्यातील सत्तेविरुद्धच कल दिसून आलेला आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्यामुळे धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश करून खासदारकी मिळवली खरी मात्र केंद्रात सत्ता भाजपाचीच राहिली. या निवडणुकीदरम्यानच नारायण पाटील यांनीही राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश केला आणि विधानसभा निवडणुकीत अपक्ष राहिलेल्या संजय मामांना पराभवाची धूळ चारली. तदनंतर झालेल्या करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीतही भाजपाचे सात नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष पदाला मात्र भाजपाला मुकावे लागले होते. या सर्व निवडणुकांमध्ये तालुक्यातील गटांना राजकीय पक्षाची किनार असली तरी मतदार संघातील आमदार व खासदार विरोधी पक्षाचे असल्यामुळे तसेच नगरपालिकेवर स्थानिक आघाडीने झेंडा फडकवल्याने या सर्व निवडणुकांचा कल केंद्र किंवा राज्यातील सत्तेविरुद्धचाच असल्यात जमा आहे.

सत्तेच्या विरोधात असले तरी खासदार मोहिते पाटील आणि आमदार पाटील हे तालुक्यातील विकास कामांना निधी मिळवण्यासाठी प्रयत्नशील तर आहेतच, याशिवाय नगरपालिकेवर अधिपत्य असलेला स्थानिक सावंत गट ही भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांशी समन्वय ठेवून आहे. या सर्वांच्या प्रयत्नांतून करमाळा शहर व तालुक्यातील विकास कामांना निधी मिळणारच आहे, परंतु जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत तालुक्यातील राजकीय गटांमध्ये जुळालेले समीकरण हे तालुक्याच्या पथ्यावर पडण्याची चिन्हे आहेत.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये तालुक्यातील विद्यमान आणि माजी आमदारांशी संलग्न सर्वच गटांचे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य समान संख्येने निवडून आलेले आहेत. निवडून आलेले बहुतेक सदस्य हे नव्या दमाचे असल्याने तसेच राज्य सरकारच्या सत्ताधारी वरिष्ठांशी जवळीक साधून असल्याने आतापर्यंत प्रलंबित असलेल्या जलसिंचन योजना आणि तालुक्यातील बंद अवस्थेत असलेले सहकारी साखर कारखाने, दुर्लक्षित असलेला जातेगाव-टेंभुर्णी महामार्ग आणि तालुक्यातील इतर दयनीय अवस्थेत असलेले रस्ते आणि विकास कामांच्या बाबतीत असलेली दोलायमान स्थिती विकासाकडे झुकण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!