करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील सावडी येथील भीमनगर परिसरात लावण्यात आलेल्या निळ्या झेंड्याच्या प्रकरणात भेदभावपूर्ण कारवाई झाल्याचा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे पश्चिम महाराष्ट्र संघटक नागेश कांबळे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दि. १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परिसरात निळा झेंडा लावण्यात आला होता. मात्र तो झेंडा विनापरवाना असल्याचे कारण देत प्रशासनाने रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास काढून टाकला आहे. याच गावात इतर ठिकाणी विविध प्रकारचे झेंडे लावलेले असताना त्यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याने संबंधित अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक भेदभाव केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

यापूर्वी सावडी गावातील मारुती मंदिराजवळ दलित समाजातील व्यक्तीवर जातिवाचक शिवीगाळ झाल्याची घटना घडल्याचेही निवेदनात नमूद असून त्याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आल्याचे सांगितले आहे.

अशा प्रकारचा भेदभाव आढळून आला, तर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ)च्या वतीने लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. हे निवेदन तहसीलदार, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.

.

.

