संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासन सज्ज असल्याची तहसीलदार ठोकडे यांची ग्वाही
करमाळा, प्रतिनिधी – कडक उन्हाळा आणि करमाळा-माढा मतदार संघातील संभाव्य पाणीटंचाई डोळ्यांसमोर ठेवून आमदार नारायण (आबा) पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पाणीटंचाई आढावा बैठक संपन्न झाली. यावेळी आ.पाटील यांनी मतदार संघातील ग्रामस्थांच्या मागण्या ऐकून घेऊन संभाव्य पाणीटंचाई परिस्थितीबाबत सुरुवातीपासूनच दक्ष असल्याचे सांगत ग्रामस्थांनी बैठकीत उपस्थित केलेल्या मागण्यांचे सुयोग्य निराकरण केले.

शनिवार दि.२५ रोजी जेऊर बाजारतळ येथील कर्मयोगी गोविंदबापू पाटील सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे, माढ्याचे नायब तहसीलदार हनुमंत जाधव, करमाळा पं.समितीचे गटविकास अधिकारी डॉ. अमित कदम आणि माढा पं. समितीचे गटविकास अधिकारी महेश सुळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

आ.पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांच्या प्रास्ताविकानंतर या बैठकीत करमाळा-माढा मतदारसंघातील विविध गावांतील रखडलेल्या जल जीवन मिशन योजना, त्यांतील व भ्रष्टाचार, सौर हातपंप, कमकुवत झालेल्या जुन्या पाणीपुरवठा योजना, उजनीच्या पाण्यावर वाढणारी व पाळीव पशुंना अपायकारक असलेली महानंदा नावाची वनस्पती, दहिगाव उपसा सिंचन योजनेचे चालू आवर्तन, उजनीची खालावलेली पाणी पातळी, पुरामुळे झालेल्या नुकसानीची प्रलंबित भरपाई, गतवर्षीची प्रलंबित पाणी बिले आणि ग्रामीण भागातील जलव्यवस्थापना बाबत अनेक प्रश्न विविध गावातील ग्रामस्थांनी मांडले. या सर्व प्रश्नांवर लोकप्रतिनिधी व उपस्थित अधिकाऱ्यांनी सविस्तर चर्चा करत तात्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीला माढा तालुका पाणी पुरवठा विभागप्रमुख उप अभियंता ए.एस. वाघमारे, करमाळा पाणी पुरवठा उप अभियंता वाल्हेकर, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र नेटके, वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके (मोहोळ), पशुसंवर्धन अधिकारी यादव, सर्व विस्तार अधिकारी, मंडल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, ग्राम महसूल अधिकारी यांच्यासह आदिनाथचे व्हाईस चेअरमन महेंद्र पाटील, संचालक डॉ. हरिदास केवारे आणि ॲड. राहुल सावंत, पं. समितीचे माजी उपसभापती गहीणीनाथ ननवरे, पंचायत समिती सदस्य स्वप्निल काळे आणि करमाळा तालुक्यासह माढा तालुक्यातील अनेक गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

सध्याला करमाळा तालुक्यात एकही टँकरची मागणी नसली तरी संभाव्य पाणीटंचाईच्या अनुषंगाने करमाळा तहसील प्रशासन सज्ज असून सरपंच किंवा ग्रामसेवकांनी उपलब्ध जलसाठ्यांचा अंदाज घेऊन त्या नुसार टँकरचे प्रस्ताव सादर करावेत, या प्रस्तावांवर लवकरात लवकर कार्यवाही केली जाणार असल्याची ग्वाही यावेळी करमाळा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली.
