उज्जैनचा अनवर बनला अनन्याचा काळ
करमाळा, प्रतिनिधी – राहुरीहून अक्कलकोटला निघालेल्या कारला टिपरची धडक बसून झालेल्या अपघातात कारमधील पाच महिन्यांची चिमुकली दगावली आहे तर इतर तिघेजण जखमी झाले आहेत. रविवार दि.१७/०५/२६ रोजी सकाळी सातच्या सुमारास अहिल्यानगर- टेंभुर्णी महामार्गावर जातेगाव नजीक हा अपघात झाला आहे.

याबाबत अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुल तालुक्यातील ब्राह्मणगाव भांड येथील सचिन सोपान वैद्य (वय-३१ वर्षे) यांनी करमाळा पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दि.१७/०५/२६ रोजी ते इर्टीका कार क्र. एम एच २० इ जे ८६८२ मधून अक्कलकोट येथे कूटूंबासह जात होते. यावेळी सकाळी सातच्या सुमारास सदर इर्टीगा कार करमाळा तालुक्यातील जातेगाव येथील जिन भवानी हॉटेल समोर आली असताना पिवळया रंगांचा विना नंबरचा टिपर चालक अनवर कासम पटेल (रा. नलेश्री, उज्जैन, मध्यप्रदेश) याने रस्त्याच्या परिस्थितीकडे लक्ष न देता आपल्या ताब्यातील टिपर हयगयीने चालवत कोणताही वळण्याचा इशारा न देता अचानक विरुद्ध बाजूला वळविला. त्यामूळे इर्टीगा गाडीची टिपरला जोरदार धडक बसली. या अपघातात फिर्यादी सचिन यांच्या गुडघ्याला, फिर्यादीचे भाऊजी नवनाथ यांना नाकाला व कमरेला तर मुलगी सान्ची हिला हाताला मार लागून गंभीर दुखापत झाली आहे. तसेच या अपघातामध्ये गाडीत असणारी फिर्यादीचे मेव्हणे घमाजी यांची पाच महिन्यांची मुलगी अनन्या हिचे डोके गाडीत आदळून ती मयत झाली आहे.

सचिन वैद्य यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसांनी टिपर चालक अनवर कासम पटेल (रा. नलेश्री, उज्जैन, मध्यप्रदेश) याच्यावर भा.न्या. सं. कलम १०६(१), २८१, १२५ (अ), १२५ (ब) तसेच मो.चा.का. कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घेतले आहे. पो.हे.कॉ. मयुर गव्हाणे हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

.

.

