August 6, 2026
IMG-20260515-WA0040

तातडीने कारवाई न केल्यास “गाव बंद” आंदोलनाचा संतप्त ग्रामस्थांचा इशारा

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील केम येथील केम-टेंभुर्णी प्रमुख जिल्हा मार्ग तथा निवृत्ती महाराज पालखी मार्गावर मोठमोठे दगड टाकून रस्ता बंद करण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यातच केम गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मुख्य पाईपलाईनही फोडण्यात आल्याने ग्रामस्थ संतप्त झाले असून याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नावे निवेदन देत ग्रामस्थांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याबाबत केम ग्रामपंचायतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हा रस्ता अनेक वर्षांपासून कायमस्वरूपी सार्वजनिक वापरासाठी सुरू आहे. सध्या HAM अंतर्गत सदर रस्त्याचे काम सुरू असताना केम गावठाण हद्दी शेजारील जमीन मालकांनी या रस्त्यावर मोठे दगड टाकून मागील एक महिन्यापासून वाहतूक पूर्णपणे बंद केल्याचा आरोप या निवेदनाद्वारे करण्यात आला आहे.

या प्रकारामुळे एसटी वाहतूक बंद झाली असून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, व्यापारी तसेच शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. यात भर म्हणून दि. १४ मे २६ रोजी रात्री केम गावाला पाणीपुरवठा करणारी ग्रामपंचायतीची मुख्य पाईपलाईनही फोडण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडला असून त्यामुळे ग्रामपंचायतीचे आर्थिक नुकसान झाले असल्याचे तसेच या प्रकारमुळे संपूर्ण गावातील नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेऊन संबंधितांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, बंद करण्यात आलेला सार्वजनिक रस्ता त्वरित मोकळा करून द्यावा तसेच ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी ग्रामस्थांची मागणी आहे.

यासंदर्भात तहसील प्रशासन, पोलीस प्रशासन, महसूल विभाग, भूमि अभिलेख विभाग, केम ग्रामपंचायत व पंचायत समिती यांनी संयुक्तपणे हस्तक्षेप करून प्रश्न मार्गी लावावेत, अन्यथा संपूर्ण केम गाव एक दिवस बंद ठेवण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आला आहे.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!