करमाळा, प्रतिनिधी – शेतीपंपांच्या मोटारींतील तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटनांनी उजनीकाठचा शेतकरी वर्ग त्रस्त असतानाच मागील काही दिवसांत थेट मोटारी चोरी करेपर्यंत या चोरांची मजल गेली आहे. अशातच नवीन खरेदी केलेली पाणबुडी मोटार शेतात नेण्यापूर्वीच चोरीला गेल्याने शेती पंपाच्या मोटारी चोरीचा कहरच झाला आहे.

त्याचे झाले असे की, दि.०९/०५/२६ रोजी तालुक्यातील वाशिंबे येथील उदयसिंह श्रीमंत झोळ हे त्यांनी पुणे येथुन ट्रान्सपोर्टने मागवलेली पाणबुडी मोटार कोर्टी येथील सिद्धिविनायक रोडलाईन्स येथून घेऊन सोमनाथ आदिनाथ झोळ यांच्यासह वाशिंबे गावाकडे निघाले होते. यावेळी दुपारी १२.१५ च्या सुमारास सावडी फाटा येथे त्यांची मोटारसायकल पंक्चर झाल्याने त्यांनी पाणबुडी मोटार उचलुन रोडच्या कडेला ठेवली व जवळच्या दुकानात मोटारसायकलची पंक्चर काढण्यासाठी गेले. मात्र त्या दुकानात पंचर काढण्याची सोय नसल्याने सोमनाथ झोळ हे गाडी घेऊन सावडी गावात पंक्चर काढण्यासाठी गेले व फिर्यादी उदयसिंह हे परत मोटार ठेवले ठिकाणी आले. परंतु त्यांना तेथे ठेवलेली लक्ष्मी कंपनीची ७.५ एच.पी. ३ स्टेजची रु.२४,००० किंमतीची पाणबुडी मोटार दिसुन आली नाही.

याबाबत उदयसिंह झोळ यांनी करमाळा पोलिसांत फिर्याद दिली असून करमाळा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पो.हे.कॉ. पांडुरंग आरकीले हे या गुन्हयाचा अधिक तपास करत आहेत.


.

.

