June 21, 2026
IMG-20260520-WA0020

करमाळा, प्रतिनिधी – सामान्य जनतेचा विचार न करता केवळ नफा कमवण्याच्या दृष्टीने कॉर्पोरेट कंपन्यांनी निर्माण केलेल्या असमतोल स्पर्धेच्या विरोधासाठी देशातील सुमारे १२ लाख ५० हजार पारंपरिक औषधी विक्रेत्यांनी बुधवार दि.२० रोजी देशव्यापी संप पुकारला होता. या संपाला करमाळा तालुक्यातून १००% प्रतिसाद मिळाला.

केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांनी निर्माण केलेल्या असमतोल स्पर्धेमुळे देशातील सुमारे १२ लाख ५० हजार पारंपरिक औषधी विक्रेत्यांचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सरकारच्या या भूमिकेविरोधात अखिल भारतीय औषध विक्रेता संघटना (AIOCDA) आक्रमक झाली असून या धोरणाला विरोध करण्यासाठीच २० मे रोजी देशभरातील औषध विक्रेत्यांनी बंद पाळला. या बंदला पाठिंबा म्हणून बुधवारी करमाळा शहरासह तालुक्यातील २४० औषध विक्रेत्यांनी मेडिकल दुकाने १००%बंद ठेवली.

सरकारने तातडीने सकारात्मक निर्णय न घेतल्यास आगामी काळात हे आंदोलन अधिक तीव्र व उग्र स्वरूपाचे करण्याचा इशारा करमाळा केमिस्ट संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटणे, सचिव रवींद्र बरीदे, उपाध्यक्ष व जिल्हा सहसचिव विवेक ननवरे, खजिनदार वैभव गायकवाड, संघटक आतिश दोशी, सदस्य अभयसिंह शेंडगे, सचिन पाटील, सुभाष गाडे, मंदार घोडके, प्रसाद माने, विराज येवले, वैभव गुरव, आनंद वाघमारे, प्रशांत गुंड, गोरख शिंदे, धनराज शिंदे, निलेश दोशी, विजय गांधी, सागर शेटे, प्रवीण नरुटे, शिवाजी हिरडे यांच्यासह करमाळा शहर व तालुक्यातील केमिस्ट बांधव बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांनी घोषणा देऊन केंद्र सरकारचा निषेध केला.

सरकारने औषध क्षेत्रातील नियंत्रित नफ्याच्या धोरणात तातडीने पुनर्विचार करावा, सरकारी नियम (डी पी सी ओ २०१३) अंतर्गत जीवनावश्यक औषधांवर २०१८ व २०२० मध्ये जारी केलेल्या दोन शासन निर्णयांसह ऑनलाईन ई फार्मसीचा मागे घेण्यात यावा तसेच इतर मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य केमिस्ट संघटनेचे अध्यक्ष तथा माजी आमदार जगन्नाथआप्पा शिंदे यांनी संबंधित केंद्रीय मंत्री, प्रशासकीय अधिकारी यांच्यासह प्रधानमंत्रींकडेही वारंवार निवेदने देऊन पाठपुरावा केला आहे. मात्र सरकार याकडे पूर्ण दुर्लक्ष करत आहे. या आडमुठ्या धोरणामुळे तसेच लोकशाही मार्गाने दिलेल्या लढ्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे शेवटी आम्हाला आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले.
– अभयसिंह शेंडगे,
सदस्य, करमाळा केमिस्ट संघटना.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!