करमाळा, प्रतिनिधी – सुट्टी निमित्त पुण्यातून गावाकडे आलेल्या युवकावर करमाळा शहरात धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी रात्री सव्वा नऊच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

या घटनेबाबत मिळालेली माहिती अशी की, पुणे येथे शिक्षणासाठी असलेला युवक सुट्टी निमित्त तसेच नातेवाईकाचे लग्न असल्याने करमाळा तालुक्यातील रोशेवाडी येथे दोन दिवसांपूर्वी आला होता. नातेवाईकाचे लग्न आटोपल्यानंतर सोमवारी सायंकाळी तो करमाळा शहरातील साठेनगर भागातील नातेवाईकांकडे गेला. यावेळी रात्री नऊच्या सुमारास हा युवक जवळून वाजत गाजत चाललेली एक मिरवणूक पाहत असताना एकाने पाठीमागून येऊन त्याच्या पाठीवर धारदार शस्त्राने वार केला. हल्लेखोर दुसरा वार करण्याच्या तयारीत असताना या युवकाने दुसरा वार चुकवण्यासाठी हाताने शस्त्र रोखून धरले. त्यामुळे त्याच्या हातालाही मोठी जखम झाली आहे.

ही घटना घडताच युवकाच्या साठे नगर येथील चुलत्याने आणि इतर नातेवाईकांनी करमाळा पोलिसांना या घटनेची खबर देऊन जखमी तरुणाला करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या युवकावर तातडीने उपचार सुरू केले.

दरम्यान उपचारानंतर सोमवारी रात्री उशिरा जखमी युवकाकडे पोलिसांनी चौकशी करुन हल्लेखोराचा आणि हल्ल्याच्या कारणाचा शोध सुरू केला आहे.

.

.

.

