रश्मी बागल यांनी फुकटचे श्रेय न घेता त्यांच्या नावाचे संदर्भीय पत्र माध्यमांसमोर सादर करण्याचे केले आवाहन
करमाळा, प्रतिनिधी – मंजूर विकास कामांचा श्रेयवाद उफाळत असतानाच संवैधानिक पदावरील लोकप्रतिनिधी म्हणून मागणी केलेल्या रस्त्याच्या मंजुरीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न म्हणजे विकास कामांना अडथळा आणण्यासारखेच असल्याचे मत आमदार नारायण पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी व्यक्त केले आहे. मंगळवार दि.२३ रोजी जेऊर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी सविस्तर बोलताना तळेकर यांनी सांगितले की, रोपळे-केम-कंदर-कन्हेरगाव या रस्त्याला निधी मिळण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे वारंवार मागणी केली होती.
.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने केम येथे ५ फेब्रुवारी २६ रोजी झालेल्या जाहीर सभेत पूर्व भागातील ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप तळेकर यांनी त्यांचे सुपुत्र अजित तळेकर यांच्या समक्ष या भागातील प्रमुख समस्या म्हणून या रस्त्याचे काम मार्गी लावावे म्हणून जाहीर मागणी केली होती. यानंतर आ. पाटील यांनी लगेचच या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला.

दरम्यान २० मे २६ रोजीच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या मुंबई प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंत्यांनी पुणे सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या सचिवांना पाठवलेल्या पत्रामध्ये आमदार पाटील यांचा संदर्भ दिलेला आहे. यानंतर १४ मे २६ रोजी या रस्त्याचा सर्वे करण्यासाठीच्या पत्रातही आ. पाटील यांच्या मागणीचा संदर्भ दिला असल्याचे तळेकर यांनी दोन्ही पत्राच्या प्रती उपस्थित पत्रकारांना सादर केल्या.

असे असताना रश्मी बागल यांनी माध्यम प्रतिनिधींना प्रेस नोट पाठवत या रस्त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बागल यांनी स्वतःच्या प्रयत्नांनी तालुक्यात विकास कामे आणावीत, त्याचे आम्ही स्वागत करू मात्र त्यांनी न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा उपरोधिक टोलाही रश्मी बागल यांना लगावला.

या पत्रकार परिषदेला जेऊरचे सरपंच पृथ्वीराज पाटील यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अजित तळेकर, पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब बिचितकर, आदीनाथचे संचालक विजयक नवले आणि भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. अर्जुनराव सरक सर उपस्थित होते.

.

