July 28, 2026
IMG-20260709-WA0045

करमाळा, प्रतिनिधी – तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा आणि अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसंदर्भात गुरुवारी मुंबई येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच करमाळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण आबा पाटील उपस्थित होते.

यावेळी या बैठकीत रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्व बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला. योजनेची पुढील प्रक्रिया गतिमान करण्यासाठी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे योजनेच्या अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल पडले असून पुढील प्रशासकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

याबाबत माहिती देताना भाजपा जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी सांगितले की, रिटेवाडी उपसा सिंचन योजना ही करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मंत्री महोदयांनी सर्वेक्षणाचे स्पष्ट आदेश दिल्यामुळे आता ही योजना मार्गी लागण्याबाबत मोठी आशा निर्माण झाली आहे. सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढील मंजुरीची प्रक्रिया गतीने पार पडेल आणि अनेक वर्षांपासूनची शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपेल. तसेच या योजनेमुळे करमाळा तालुक्यातील मोठे क्षेत्र सिंचनाखाली येणार असून हजारो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रयत्नांना या बैठकीत सकारात्मक दिशा मिळाली असून, जलसंपदा मंत्र्यांनी दिलेल्या सर्वेक्षणाच्या आदेशांमुळे ही महत्त्वाकांक्षी योजना लवकरच मार्गी लागेल असा विश्वास गणेश चिवटे यांनी यावेळी व्यक्त केला.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!