करमाळा, प्रतिनिधी – जीर्ण झाल्यामुळे बंद असलेल्या करमाळा नगरपालिकेच्या शाळेच्या प्लॅस्टरचा उंचावरील भाग गुरुवारी रहदारीच्या रस्त्यावर निखळून पडला. सुदैवाने यावेळी रस्त्यावरून कोणी जात नसल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

शहरातील मेन रोड या वर्दळीच्या रस्त्यावर नगरपालिका मुलांची शाळा नं.२ ची जुनी तीन मजली इमारत आहे. या इमारतीचे प्लॅस्टर वेळोवेळी ढासळत असल्याने गेल्या काही वर्षांपासून ही इमारत बंद अवस्थेत आहे. इमारतीच्या आत प्रवेश नसला तरी इमारतीच्या रस्त्याच्या बाजूच्या सज्जाचेही प्लॅस्टर जीर्ण झालेले आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर जिन्याच्या टोपीच्या सज्जाच्या प्लॅस्टरचा मोठा भाग मेन रोडवर निखळून पडला.

सुदैवाने हे पापुद्रे उंचावरून खाली पडतेवेळी इमारतीसमोरुन कोणी जात नसल्याने काही विपरीत घटना घडली नसली तरी सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने तसेच शाळेची इमारत मोडकळीस आल्याने नगरपालिका प्रशासनाने यासंदर्भात लवकरात लवकर ठोस कार्यवाही करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

.

.

.

.

.

