July 28, 2026
IMG-20260709-WA0038

सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा, लवकरच सर्वेक्षण होणार

करमाळा, प्रतिनिधी – नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी आता आमदार नारायण आबा पाटील यांनी अधिक गतीने पाठपुरावा सुरू केला असून मंत्रालयात याबाबत बैठक घेण्याच्या त्यांच्या मागणीस यश आले आहे. राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनित खास नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी बैठक पार पडली.

या बैठकीस माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच आमदार नारायण आबा पाटील व जलसंपदा विभागाचे महत्वाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाची चर्चा झाली. नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी नियामक मंडळाच्या बैठकीत या विषयास मंजुरी देण्यात आली असली तरी या कामाचा चतुर्थ सुप्रमा मध्ये समावेश केलेला असल्याचे सांगून ही बाब नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेसाठी अधिक काळ वाट पहायला लावणारी असल्याचे आ. पाटील यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

तसेच नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षण कामाचा तृतीय सुप्रमात समावेश करुन तातडीने या कामास पन्नास लाख रुपये मंजुर करण्यात यावेत, अशी मागणी आ.पाटील यांनी केली. करमाळा तालुक्याच्या उत्तर भागातील सुमारे पासष्ट हजार एकर क्षेत्र या योजनेमुळे ओलिताखाली येणार असल्याचे सांगुन शेतकऱ्यांना आर्थिक विकासाच्या वाटेवर आणण्यासाठी हा अतिशय महत्वाचा प्रश्न असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले. यावर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन अधिकाऱ्यांना या बाबीची पडताळणी ठरण्याचे आदेश दिले आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी निधी देण्यात येणार असल्याचेही ना. विखे पाटील यांनी सांगितले आहे.

आ. नारायण आबा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे आता नियोजित रिटेवाडी उपसा सिंचन योजनेच्या सर्वेक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!