करमाळा, प्रतिनिधी – करमाळा मतदारसंघातील शेतकरी वीजटंचाईमुळे तीव्र अडचणीत सापडले असून शेती पंपांना दररोज किमान आठ तास वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी आमदार नारायण आबा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनात त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन यासंदर्भातील लेखी निवेदन सादर केले.

निवेदनात करमाळा तालुक्यातील उजनी, भीमा-सीना जोडकालवा, सीना-कोळगाव प्रकल्प, मांगी तलाव तसेच विहिरी व कूपनलिकांद्वारे सिंचन होणाऱ्या भागांतील वीजकपातीमुळे केळी, ऊस, डाळिंब आदी नगदी पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. उजनी धरणात पाण्याचा विसर्ग वाढूनही वीजअभावी शेतकऱ्यांना पिकांना पाणी देता येत नसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

मतदारसंघातील अनेक भागांत अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांना पिके वाचविण्यासाठी अतिरिक्त सिंचन करावे लागत आहे. वीजटंचाईचा परिणाम दुग्ध व्यवसायासह इतर शेतीपूरक उद्योगांवर होत असून घरगुती वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही विपरीत परिणाम होत असल्याचे आमदार पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

उजनी धरणातील पाणीपातळी आता प्लसमध्ये आल्याने शेती पंपांना तातडीने आठ तास वीजपुरवठा सुरू करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित विभागाला आवश्यक सूचना देण्यात येत असल्याचे सांगितले.

.

.

.

.

