बाराव्या पुण्यस्मरणानिमित्त नातीने आजोबांना केलेल्या आर्त विनवणीने पाणावले उपस्थितांचे डोळे
करमाळा, प्रतिनिधी – कामगार नेते स्व. सुभाषआण्णा सावंत यांनी स्वतःचे संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी वाहून घेतले होते. त्यांच्यानंतर सावंत परिवारातील अनेक सदस्य विविध पदांवर लोकप्रतिनिधित्व करत आहेत. सावंत परिवारावर सामान्य जनतेचे हे प्रेम म्हणजे स्वर्गीय सुभाष अण्णांच्या समाजसेवेची पोचपावती असल्याचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध समाज प्रबोधन बाल कीर्तनकार छोटे इंदुरीकर ह.भ.प. माऊली महाराज काकडे यांनी सांगितले. स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या १२व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
कष्टकरी आणि वंचितांचे नेते अशी ओळख असलेल्या स्व. सुभाषआण्णा सावंत यांच्या १२ व्या स्मृतिदिनानिमित्त करमाळा तालुका हमाल पंचायत आणि सावंत गल्ली येथील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने शुक्रवार दि.१४ ऑगस्ट रोजी सावंत गल्ली येथील मारुती मंदिरा जवळ किर्तन आणि रक्तदान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी दहा ते दुपारी बारा वाजेपर्यंत ह.भ.प. माऊली महाराज काकडे यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी ह.भ.प. काकडे महाराज यांनी या कीर्तनातून अध्यात्मासह समाज प्रबोधनाची अनेक उदाहरणे देत स्व. सुभाषआण्णांच्या प्रेरणेने सावंत कुटुंबाकडून होत असलेल्या अविरत सेवेचे कौतुक केले.
कीर्तनानंतर स्व. सुभाषआण्णांची नात कु. जान्हवी हिने आपल्या आजोबांच्या आठवणी आठवत अतिशय हृदयस्पर्शी शब्दांमध्ये स्व. सुभाष अण्णांना परत येण्याची साद घातली. ही साद ऐकून कीर्तनात उपस्थित महिला श्रोत्यांना अश्रू अनावर झाले तर उपस्थित मान्यवरांचे डोळे पाणवले. यानंतर भिमराव लोंढे यांनी स्व. सुभाष आण्णा यांच्या जीवन चरित्रावर लिहिलेले संगीतमय कवन सादर करत स्व. आण्णांच्या आठवणी उजागर केल्या.
यावेळी आयोजित पुष्पांजली सोहळ्यात करमाळा शहर व तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांसह नागरिकांनी उपस्थित राहून स्व. सुभाषआण्णांना आदरांजली वाहिली. कीर्तनासोबतच स्व. सुभाषआण्णांच्या पुण्यस्मरणानिमित्त शुक्रवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत मारुती मंदिरासमोरील प्रांगणात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने , मुख्याधिकारी सचिन तपसे आणि करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतीजा वेदपाठक यांच्या हस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या शिबिरात १७५ रक्तदात्यांनी स्वेच्छेने रक्तदान केले.
.
.
.
.