सोनु साडेकर यांच्या श्रमदानातून दुरुस्ती
करमाळा, प्रतिनिधी – रस्त्यावर पसरलेल्या खडीमुळे होणारे अपघात लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते सचिन गायकवाड यांच्या सूचनेवरून खडी गोळा करून पुन्हा खड्ड्यात ओढण्यात आली आहे. यामुळे दुचाकी घसरण्याची शक्यता टळली आहे.

शहरातील रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे नागरिक हैराण झालेले असतानाच तात्पुरती डागडुजी केलेल्या खड्ड्यांतील खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने दुचाकी घसरून पडण्याचे प्रमाण वाढले आहे. शहरातील छत्रपती चौकासमोरही खड्ड्यांतील खडी रस्त्यावर पसरल्याने असेच अपघात होत असल्याचे स्व. बाबुराव तात्या गायकवाड प्रतिष्ठानचे सचिन गायकवाड यांच्या निदर्शनास आले. यानंतर त्यांनी करमाळा नगरपालिकेशी संपर्क साधला असता कर्मचारी 15 ऑगस्ट च्या तयारीत असल्याने उद्या दुपारनंतर सदर बाबीकडे लक्ष देण्यात येईल असे सांगण्यात आले.

मात्र छत्रपती चौक येथे श्रीदेवीचा माळ रस्त्याकडून करमाळा बसस्थानकाकडे जाणाऱ्या काटकोनातील वळणावर शुक्रवारी अनेक वाहने घसरून पडत होती. त्यामुळे गायकवाड यांनी भवानी पेठ येथील युवक सोनू साडेकर यांच्या मदतीने सदर खडी खोऱ्याने खड्ड्यात ओढली. या खडीमुळे रस्त्यातील मोठा खड्डा भरून तर निघालाच याशिवाय पसरलेल्या खडीमुळे दुचाकी घसरण्याचा धोका टळला.

कै. बाबुराव तात्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सचिन गायकवाड यांच्या मातोश्री या करमाळा नगरपालिकेत नगरसेविका आहेत. नगरसेविका प्रतिनिधी असूनही केवळ प्रशासनाच्या भरवशावर न राहता सामाजिक जबाबदारीचे भान ठेवत सचिन गायकवाड यांनी दाखवलेल्या या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

.

.

.

.

