September 4, 2026
IMG-20260815-WA0018

दत्तकला संस्थेशी संबंधित नोंदी, संगणक व साहित्य जप्त; रामदास झोळ यांचा शोध सुरू

करमाळा, प्रतिनिधी – अनिष्ट व अघोरी प्रथा तसेच जादूटोण्याच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक करून मिळविलेल्या कथित अवैध पैशांची विल्हेवाट लावल्याप्रकरणी कुर्डूवाडी पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. राजेंद्र गोकुळ हुंबे आणि लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दोघांना न्यायालयाने १७ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात २३ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा क्रमांक १९२/२०२६ दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(२), ३१८(४), ३(५) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांचा प्रतिबंध करण्याबाबतच्या अधिनियमातील कलम ३(२), ३(३) आणि वाढीव कलम १११(२) यांसह इतर कलमांनुसार हा गुन्हा दाखल आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी मनोहर उर्फ मामा चंद्रकांत भोसले आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात आतापर्यंत सहा गुन्हे दाखल झाले आहेत. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी तपासासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस घटकातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष एसआयटी पथक स्थापन केले आहे. या पथकाने कुर्डूवाडी पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात आतापर्यंत २३ आरोपी निष्पन्न केले असून, त्यापैकी १० जणांना अटक करण्यात आली आहे.

तपासा दरम्यान मनोहर मामा भोसले याने अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोण्याच्या माध्यमातून कथितरित्या अनेकांची फसवणूक करून मिळविलेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यासाठी दौंड-पुणे येथील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा वापर केल्याचे निष्पन्न झाल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यामुळे झोळ यांच्यासह संस्थेशी संबंधित काही व्यक्तींना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. रामदास झोळ यांचा सध्या शोध सुरू आहे.

तपासादरम्यान दत्तकला इन्स्टिट्यूटमधील महत्त्वाच्या नोंदी असलेली रजिस्टर, संगणक आणि अन्य साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. प्रकरणातील इतर पाहिजे आरोपींचा शोध सुरू असून, तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत.

.

.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!