करमाळा, प्रतिनिधी -पत्रकार संघ, नवी पेठ, पुणे येथे माध्यमांशी बोलताना नवनाथ वाघमारे यांनी मराठा समाजातील महिला आणि तरुणांबाबत अश्लील व अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप करत करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाज आणि बहुजन बांधव आक्रमक झाले आहेत. संबंधित वक्तव्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्याचे सांगत वाघमारे यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत सकल मराठा समाज आणि बहुजन समाजातील नागरिकांनी करमाळा पोलीस ठाण्यात निवेदन दिले. नवनाथ वाघमारे यांच्या वक्तव्यामुळे मराठा आणि ओबीसी समाजामध्ये तेढ व वैमनस्य निर्माण होण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच या वक्तव्यामुळे समाजातील महिला व मुलींच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणाची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी योग्य ती कारवाई केली नाही, तर करमाळा तालुक्यात सकल मराठा समाज आणि बहुजन बांधवांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

नवनाथ वाघमारे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी एन एस) २०२३ मधील कलम १९६, २९९, ३५२, ३५३, ३५३(२), ३५६ तसेच माहिती तंत्रज्ञान कायदा २००० मधील कलम ६७ अन्वये कारवाई करण्यात यावी. तसेच संबंधित वक्तव्याचे व्हिडिओ, डिजिटल पुरावे आणि इतर माध्यमांतील माहिती सुरक्षित ठेवून या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणीही करण्यात आली.

यावेळी करमाळा पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी सकल मराठा समाज तसेच बहुजन समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

.

.

