September 4, 2026
रामदास झोळ

मनोहर भोसले प्रकरणाच्या तपास अहवालात प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

करमाळा, प्रतिनिधी – मनोहर भोसले याच्याशी संबंधित करमाळा पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष रामदास मधुकर झोळ यांनी दाखल केलेला अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज बार्शी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. रोटे यांनी २१ ऑगस्ट रोजी हा आदेश दिला आहे.

प्रा. रामदास झोळ यांनी करमाळा पोलिस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ४१२/२०२६ मध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी न्यायालयात वकिलामार्फत अर्ज दाखल केला होता. या गुन्ह्यात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा २०१३ मधील कलम ३(२) व ३(३) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. झोळ यांच्या वकिलांनी न्यायालयात प्रा. झोळ यांच्यावरील आरोप खोटे व निराधार असून, गुन्ह्याशी त्यांचा कोणताही संबंध नसल्याचा दावा केला. तसेच मनोहर भोसले किंवा त्याच्या मठाशी प्रा.झोळ यांचा संबंध नसल्याचे आणि त्यांच्याकडून कोणतीही जप्ती करावयाची नसल्याने पोलिस कोठडीतील चौकशीची आवश्यकता नसल्याचे वकिलांनी सांगितले. सुरुवातीच्या एफआयआरमध्ये झोळ यांचे नाव नसल्याचाही युक्तिवाद वकिलांनी केला.

मात्र, न्यायालयाने तपासातील ११ ऑगस्टच्या रिमांड अहवालाचा संदर्भ देताना, झोळ यांचा आरोपी क्रमांक आठशी व्यवहार असल्याचे तसेच आरोपी क्रमांक एकविरुद्धच्या कथित गुन्ह्यांमध्ये त्यांचा प्रथमदर्शनी सहभाग असल्याचे दिसून येते, असे निरीक्षण नोंदवले.

तसेच भारतीय न्याय संहितेचे कलम १११ लागू होते किंवा नाही, याबाबत या टप्प्यावर अंतिम निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले. त्यासाठी तपासातील उपलब्ध संपूर्ण रेकॉर्डचा विचार करणे आवश्यक असल्याचेही न्यायालयाने नमूद केले.

गुन्ह्याचे स्वरूप, आरोपांची गंभीरता आणि उपलब्ध तपास अहवालातील बाबींचा विचार करता झोळ यांना अंतरिम अटकपूर्व जामीन देण्यास योग्य आधार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार रामदास झोळ यांचा अंतरिम अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळण्यात आला आहे.

.

.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!