करमाळा, प्रतिनिधी – करमाळा नगर परिषद अंतर्गत दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत स्थापीत महिला बचत गटांना त्यांच्या उत्पादित वस्तु व पदार्थ यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध व्हावी, महिलांच्या सक्षमीकरणाला आणि त्यांच्यातील उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महिला बचत गट आठवडी बाजाराचा मंगळवार दि.२५ ऑगस्ट रोजी उत्साहात शुभारंभ करण्यात आला.
शहरातील किल्लावेस येथील खोलेश्वर महादेव मंदिरासमोर असलेल्या माजी आमदार जयवंतराव नामदेवराव जगताप सामाजिक सभागृहात भरविण्यात आलेल्या या आठवडी बाजाराचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. मोहिनी सावंत यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्ष अतुल फंड, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती श्रीमती निर्मलाताई गायकवाड, मुख्याधिकारी सचिन तपसे, श्रद्धा तपसे यांच्यासह सर्व नगरसेविका व नगरसेवक यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून या बाजारातील खरेदी विक्रीचा शुभारंभ करण्यात आला. उद्घाटनानंतर उपस्थित मान्यवरांनी महिला बचत गटांच्या स्टॉलला भेट देऊन विविध उत्पादनांची पाहणी व खरेदी केली.
मंगळवारी भरवण्यात आलेल्या पहिल्याच बाजारात जवळपास २६ बचत गटांनी सहभाग घेतला. या बचत गटांच्या माध्यमातून वाळवणीचे पदार्थ, मसाले नित्योपयोगी वस्तू, सौंदर्य प्रसाधने, हस्तकलेच्या शोभेच्या वस्तू, सेंद्रिय भाजीपाला आणि खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले. या बाजाराला शहरातील महिलावर्गाने प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे मंगळवारी दिवसभरात या बाजारात जवळपास एक लाख रुपयांची उलाढाल झाली. हा उपक्रम पार पाडण्यासाठी करमाळा नगरपालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वर्गाने परिश्रम घेतले. महिलांना स्थानिक पातळीवर थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणे, हक्काचा ग्राहक मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व आत्मनिर्भर बनवणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. पुढील काळात शहरातील पदार्थ आणि वस्तुंच्या विक्रीसाठी उद्योग भवन निर्माण करण्यात येणार आहे. -सौ. मोहिनी संजय सावंत, नगराध्यक्षा, करमाळा नगरपालिका. बचत गटांच्या माध्यमातून अनेक पदार्थ व वस्तूंची निर्मिती केली जाते. मात्र महिला वर्गाला हे पदार्थ किंवा वस्तू बाजारात विक्री करण्यासाठी मर्यादा पडतात. करमाळा नगरपालिकेने बचत गटांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून दिल्याने महिला वर्गाला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित वस्तू विक्री करण्यास मोलाची मदत होणार आहे. -सौ. प्रियंका गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्या, करमाळा. परंपरागत मातीची खेळणी बनवण्याचा व्यवसाय आणि विविध पदार्थ बनवण्याची आवड असल्याने आम्ही उमेद बचत गटाच्या दहा महिलांच्या माध्यमातून उपवासाचे पापड, कुरडई, खिच्चे, शेवया, साखरेचा रुखवत, भातुकलीची खेळणी बनवतो. या वस्तूंच्या विक्रीसाठी नगराध्यक्षा सौ.मोहिनी सावंत यांनी हक्काची बाजारपेठ मिळवून दिल्याने आमचा या व्यवसायातील उत्साह वाढणार आहे. -यशोदा रतनलाल परदेशी, अध्यक्षा, उमेद महिला बचत गट, करमाळा.
.
.