September 4, 2026
IMG-20260826-WA0043

फुलसौंदर चौक येथून कामाचा शुभारंभ

करमाळा, प्रतिनिधी – कालबाह्य झालेल्या पाईपलाईन मुळे सतत विस्कळीत होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शहरातील नागरिक त्रस्त झाले होते. या त्रासातून सुटका होण्यासाठी नगरपालिका निवडणुकीत नागरिकांनी नव्या दमाच्या लोकप्रतिनिधींना निवडून दिले होते. ‌ या बदलाची फलश्रुती दिसून येण्यास सुरुवात झाली असून बुधवारी शहरातील पंजाब वस्ताद चौक ते स्वामी विवेकानंद चौक दरम्यान नवीन पाईपलाईन टाकण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली.

बुधवार दि.२६ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता करमाळा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ. मोहिनी संजय सावंत यांच्या हस्ते आणि उपनगराध्यक्ष अतुल फंड, पाणीपुरवठा सभापती विक्रम सिंह परदेशी यांच्यासह सर्व नगरसेवकांच्या प्रमुख उपस्थितीत या कामाचा शुभारंभ करण्यात आला. ३६ लाख रुपये अंदाजित खर्च असलेल्या या पाईपलाईनच्या कामात आवश्यक दाबानुसार १००, २००, २५० मिमी व्यासाची पाईपलाईन वापरली जाणार आहे. दीर्घकालीन आणि वेगवान वापराच्या दृष्टीने जुन्या सी आय ऐवजी एचडीपीई पाईप चा वापर या कामात होणार असल्याचे नगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या अभियंता शितल बहाड यांनी सांगितले आहे.

या कार्यक्रमाला नगरसेविका चैताली सावंत, , पूजा इंदलकर, स्वाती फंड, सुवर्णा आलाट, नगरसेवक प्रशांत ढाळे, संजय (पप्पू) सावंत, सचिन घोलप, सचिन गायकवाड, रवींद्र जाधव, रामभाऊ ठाणे, विजय घोलप, संदीप कांबळे, हुमरान मुलाणी, दीपक चव्हाण, सुनील लुणिया, सुनील बनसोडे, सिद्धेश लावंड, महादेव फंड, तुकाराम (पिलू) इंदलकर यांच्यासह जेष्ठ नागरिक महादेव दगडे, मुंबई गांधी, अमोल जगताप, महेश मोरे, सुशील कात्रेला, अल्लाउद्दीन शेख यांच्यासह सर्व व्यापारी वर्ग व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नुकतेच शहरातील शाहूनगर भागातील पाईपलाईनचे काम पूर्ण झालेले आहे. आज मेन रोड येथील मुख्य पाईपलाईनचे काम सुरू झाले असून, पाईपलाईन नंतर रस्त्याचेही काम लवकरच मार्गी लागणार आहे. अशाच पद्धतीने शहरातील इतर भागातील पाईपलाईन व रस्त्यांची कामेही केली जाणार आहेत. तिसऱ्या श्रावणी सोमवारची रथयात्रा आणि गणेशोत्सव आगमन व विसर्जन मिरवणुकांना अडथळा होणार नाही या दृष्टीने हे काम टप्प्या-टप्प्याने करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदाराला दिल्या आहेत.
-सौ. मोहिनी संजय सावंत,
नगराध्यक्षा, करमाळा नगरपालिका.

अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या पाईपलाईनच्या कामाचा शुभारंभ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.

.


.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!