करमाळा शहर व तालुक्यातील दोन हजारांहून अधिक भाविकांचा सहभाग
करमाळा, प्रतिनिधी – श्रावण महिन्याचे औचित्य साधून श्री देवीचा माळ येथील श्री कमलादेवी मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या वतीने सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक उपक्रमात दोन हजारांहून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.
श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य श्री आण्णासाहेब मोरे (गुरुमाऊली) यांच्या
मार्गदर्शनानुसार श्री दुर्गा सप्तशतीचे पाठ केल्यानंतर घरातील विविध अडचणी दूर होतात. मात्र घराघरातून वैयक्तिकरित्या ही सेवा रुजू करणे शक्य होत नसते. त्यामुळे करमाळा येथील दिंडोरी प्रणित श्री स्वामी सेवा केंद्राच्या वतीने गुरुवार दिनांक २० ऑगस्ट रोजी श्री कमलादेवी मंदिरात सहस्त्र श्री दुर्गा सप्तशती पाठाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी श्री जगदंबा कमलादेवी मंदिर समितीचे सचिव अनिल पाटील व ॲडव्होकेट लता पाटील यांच्या हस्ते विधिवत पूजा व आरती करण्यात आली. या धार्मिक सोहळ्यास मंदिर समितीचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, विश्वस्त सुशील राठोड, डॉ. रोहन पाटील, राजेंद्र वाशिंबेकर तसेच मंदिराचे पुरोहित श्याम पुराणीक, पुजारी रत्नदीप पुजारी, रामदास -सोरटे, भारत सोरटे, व्यवस्थापक अशोक गाठे, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे संदीप कदम, सौ. रेश्मा कदम, सौ. सुमन नाव्हकर, वीर सर, वीर मॅडम यांच्यासह मंदिरातील पुजारी, सेवेकरी मानकरी उपस्थित होते. तसेच श्रीदेवीचा माळ ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून या धार्मिक सोहळ्यात सहभागी झाले. मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेल्या या भव्य-दिव्य धार्मिक उपक्रमामुळे संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. या धार्मिक उपक्रमात अपेक्षेपेक्षा जास्त महिला व पुरुष भाविकांनी गर्दी करत श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राच्या सामुहिक कुंकूमार्चन आणि श्री दुर्गा सप्तशती पाठाचे वाचन करत जवळपास २१०० पाठांची सेवा रुजू केली. सकाळी दहा ते सायंकाळी साडेचार या वेळेत हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमादरम्यान श्री कमलादेवी मंदिरात परमपूज्य मोरे दादा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. याशिवाय यावेळी विविध धार्मिक पुस्तकांसह राखी पौर्णिमेनिमित्त विक्रीस ठेवण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण राख्यांच्या स्टॉलवर भाविकांनी गर्दी केली होती.
श्री दुर्गा सप्तशती पाठा दरम्यान गुरु पुत्र श्री चंद्रकांतदादा मोरे यांनी उपस्थितांशी मोबाईल द्वारे हितगुज करत स्वामीसेवेसह दैनंदिन धार्मिक सण आणि व्रतवैकल्ये याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. पाठ संपन्न झाल्यानंतर सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
.
.